बोर्डाच्या निर्णयाला ज्यूक्टोचा ठाम विरोध केंद्रसंचालक-पर्यवेक्षक अदलाबदल व सीसीटीव्ही सक्ती नको – जळगावात जोरदार निवेदन
![]()
बोर्डाच्या निर्णयाला ज्यूक्टोचा ठाम विरोध
केंद्रसंचालक-पर्यवेक्षक अदलाबदल व सीसीटीव्ही सक्ती नको – जळगावात जोरदार निवेदन
जळगाव | प्रतिनिधी :
आगामी फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा अधिक कॉपीमुक्त करण्यासाठी केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांची अदलाबदल तसेच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सक्ती करण्याचे नियोजन केले आहे. मात्र या निर्णयाला जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (ज्यूक्टो) यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
या संदर्भात नाशिक बोर्डाकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा चर्चा न करता निर्णय लादण्यात आला, असा आक्षेप घेत ज्यूक्टोच्या वतीने आज जळगाव येथील भैय्यासाहेब गंधे सभागृहात (ला. ना. शाळा) नाशिक विभागीय मंडळाचे सचिव मा. श्री. मोहनजी देसले व सहसचिव मा. श्री. मच्छिंद्रजी कदम यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
ज्यूक्टोच्या वतीने प्रा. नंदन वळिंकार, प्रा. सुनील सोनार, प्रा. सुनील गरुड, प्रा. अतुल इंगळे, प्रा. गजानन वंजारी, प्रा. शैलेश राणे, प्रा. रमाकांत धनगर, प्रा. संजय पाटील, प्रा. राजेंद्र ठाकरे व प्रा. सुनीता पाटील यांनी बोर्डाच्या निर्णयातील त्रुटी अधोरेखित करत,
👉 केंद्रसंचालक-पर्यवेक्षक अदलाबदलामुळे प्रशासनावर ताण वाढेल,
👉 सीसीटीव्ही सक्तीमुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल केंद्रांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडेल,
👉 शिक्षक संघटनांशी सल्लामसलत न करता निर्णय घेणे अन्यायकारक आहे,
अशा ठाम भूमिका मांडल्या.
यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सौ. कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी सौ. रागिणीताई चव्हाण, गटशिक्षणाधिकारी श्री. विजय पवार (पाचोरा) व श्री. अजितजी तडवी (जळगाव) यांची उपस्थिती लाभली.
ज्यूक्टोने बोर्डाकडे मागणी केली की, शिक्षक संघटनांशी सखोल चर्चा करूनच धोरणात्मक निर्णय घ्यावेत अन्यथा भविष्यात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात येईल.

