“ग्रामीण महिलांनी घेतले स्वावलंबनाचे धडे “आधार संस्थेतर्फे महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण संपन्न
![]()
“ग्रामीण महिलांनी घेतले स्वावलंबनाचे धडे “आधार संस्थेतर्फे महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे याकरिता विविध व्यावसायिक प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येते.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
याच उपक्रमांतर्गत १२ दिवसीय अॅडव्हान्स शिवणकाम प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात दोन बॅचमध्ये एकूण १३० महिलांनी यशस्वीरीत्या सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान ड्रेस, ब्लाऊज, कुर्ता, पंजाबी ड्रेस तसेच विविध प्रकारच्या आधुनिक डिझाईन्स शिवण्याचे सखोल मार्गदर्शन प्रात्यक्षिकांसह करण्यात आले.
या प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये म्हणजे महिलांसाठी मोफत प्रशिक्षणासह आवश्यक साहित्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले असून, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे महिला घरबसल्या शिवणकामाचा व्यवसाय सुरू करू शकणार आहेत.
उमेद अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापक श्रीमती सीमा रगडे, आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद यांच्या हस्ते उपस्थित महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांनी महिलांना आर्थिक स्वावलंबन व उद्योजकतेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी आधार संस्थे चे दिपक संदानशिव यांनी शासनाच्या विविध योजना व व्यवसाय सुरू करण्यासाठी उपलब्ध असलेल्या मदतीबाबत माहिती दिली.
प्रशिक्षक चैताली साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सूर्यवंशी यांनी केले, नियोजन प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर मुरलीधर बिरारी व उर्जिता शिसोदे यांनी पाहिले.
कार्यक्रमात आनंद पगारे यांनी बालविवाह, बालकामगार व बाल लैंगिक अत्याचार याविषयी उपस्थित महिलांना माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश महाजन व दिपक विश्वेश्वर यांनी सहकार्य केले. या प्रशिक्षणामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास निश्चितच मदत होणार आहे.

