खानदेश शिक्षण मंडळ त्रैवार्षिक निवडणूक २०२५ : ६६.४७ टक्के मतदान, आशीर्वाद व परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत , उदया निकालाकडे सर्वांचे लक्ष..
![]()
खानदेश शिक्षण मंडळ त्रैवार्षिक निवडणूक २०२५ : ६६.४७ टक्के मतदान, आशीर्वाद व परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत
उदया निकालाकडे सर्वांचे लक्ष..
अमळनेर प्रतिनिधी :
खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या त्रैवार्षिक निवडणूक–२०२५ अंतर्गत आज रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ५,४९२ मतदारांपैकी ३,६५१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, ६६.४७ टक्के इतके समाधानकारक मतदान झाले आहे.
सकाळी ठरलेल्या वेळेत मतदानास सुरुवात होऊन संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता निवडणूक प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे मतदान सुरळीत झाले.
या निवडणुकीत आशीर्वाद पॅनल व परिवर्तन पॅनल यांच्यात अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळाली. दोन्ही पॅनलच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मतदान केंद्रांवर दिवसभर मतदारांची ये-जा सुरू होती. काही काळ रांगा लागल्याचेही चित्र दिसून आले.
मतदानानंतर मतदारांमध्ये चर्चेला उधाण आले असून, “मतदारांनी धनलक्ष्मीचाही चांगला लाभ घेतला,” अशी कुजबुज अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ औपचारिक न राहता प्रतिष्ठेची आणि निर्णायक ठरणारी लढत बनली आहे, हेच या निवडणुकीचे खरे सत्य असल्याची भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, उदया सोमवार दि. ५ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असून, निकालाकडे संपूर्ण शैक्षणिक व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कोणता पॅनल विजयी ठरणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.




