रंगला बाल आनंद मेळावा; चिमुकल्यांच्या उत्साहाला उधाण , जवखेडे शाळेत बालिका दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
![]()
रंगला बाल आनंद मेळावा; चिमुकल्यांच्या उत्साहाला उधाण
जवखेडे शाळेत बालिका दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
आज दिनांक ३ जानेवारी २०२६, शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवखेडे (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून तसेच बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
“रंग रंगला आनंद मेळा, बालकांचा उत्साह आगळा” या उक्तीप्रमाणे संपूर्ण शाळा परिसर बालकांच्या आनंदाने फुलून गेला.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शाळेचा प्रमुख ध्यास असून, पुस्तकी शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान, संवाद कौशल्य, व्यवहारज्ञान व आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान पाटील, सदस्य संतोष पाटील, रविंद्र माळी, अरविंद बंजारा, सुरेखा वाडेकर, बाला उपक्रम समितीचे अध्यक्ष दादासो प्रशांत पाटील, मा. दादासो नेताजी पाटील, मा. सरपंच ताईसो जयश्री कैलास माळी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा ताईसो सपना सोनू पाटील, सर्व माता-पालक व मुख्याध्यापक छगन पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यानंतर माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन करण्यात आले.
या बाल आनंद मेळाव्यात इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या नानाविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून विक्रीचा अनुभव घेतला. यात बटाटा वडा, चौला फळी, भेळ, पोहे, खमन, गोड बोरे, चॉकलेट, वेफर्स, पॉपकॉर्न, उसळ, कचोरी, समोसा, बॉम्बे वडा, पाणीपुरी, तिळाचे लाडू, भुईमुगाच्या शेंगा, हरभऱ्याची उसळ, आप्पे, आलू पराठा, गाजराचा हलवा, मुरमुरे लाडू, पापड, शेव, चिक्की, गोड भजी, शेंगदाण्याची बर्फी आदी पदार्थांचा समावेश होता.
गावातील ग्रामस्थ व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या स्टॉलवर खरेदी केली व विद्यार्थ्यांना भरभरून प्रोत्साहन दिले. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद व आत्मविश्वास पाहून उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक छगन पाटील यांनी सर्व ग्रामस्थ, पालक व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक मुकेश पाटील सर यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक छगन पाटील, उपशिक्षिका रत्नप्रभा साळुंखे, रेखा पाटील, सुनिता पाटील, अर्चना बागुल, तसेच उपशिक्षक मुकेश पाटील व माधवराव ठाकरे सर यांनी विशेष मेहनत घेतली.
बालकांच्या कलागुणांना व उद्योजक वृत्तीला चालना देणारा हा बाल आनंद मेळावा उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील, असेच वातावरण जवखेडे शाळेत अनुभवायला मिळाले.

