“मुलगी म्हणजे घराची शान” — सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक बालिका दिवस उत्साहात
![]()
“मुलगी म्हणजे घराची शान” — सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक बालिका दिवस उत्साहात
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील कनिष्का फाउंडेशन संचालित सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, तांबेपुरा येथे जागतिक बालिका दिवस मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. स्त्री शिक्षणाची ज्योत समाजात पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना उजाळा देत हा कार्यक्रम संपन्न झाला.
समाजाला जिने दिली,
ज्ञानाची सावली;
धन्य ती क्रांतीज्योती,
सावित्री माऊली…
या भावपूर्ण ओळींनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. भारती संजय सोनवणे (राज्य परिषद सदस्य – भाजपा) उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे चेअरमन श्री. महेश पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी मानवी पंकज पाटील हिने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत प्रभावी मनोगत व्यक्त केले. तिच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या मनावर विशेष छाप पाडली.
सोनपावली येथे जीवनी,
हसते-खेळते बागडते;
मुलगी असते घरात ज्या,
अवघ्या घराचे गोकुळ करते…
३ जानेवारी जागतिक बालिका दिनाच्या निमित्ताने शाळेत लहान मुलींसाठी एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी सौ. भारती संजय सोनवणे यांनी सहभागी विद्यार्थिनींना बक्षिसे प्रदान करून त्यांचे कौतुक केले व प्रेरणादायी मार्गदर्शन करून मुलींचे मनोबल उंचावले.
कार्यक्रम पाहण्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. अनिता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. भारती पाटील यांनी केले.
हा कार्यक्रम विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, समानता व स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.
—



