मुंगसे येथे सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
![]()
मुंगसे येथे सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
मुंगसे, ता. अमळनेर | प्रतिनिधी
मुंगसे येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व जीवनदायी अंगणवाडी येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व राजमाता जिजाऊ जयंती विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचे मुखवटे परिधान करून त्यांच्या प्रतिमांचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमादरम्यान लहानग्यांनी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते व भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम मुख्याध्यापक जगदीश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. उपशिक्षक अशोक इसे सर यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून स्वतः सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनपटावरील सविस्तर व प्रेरणादायी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
याप्रसंगी अंगणवाडी सेविका उषाबाई भानुदास पाटील, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्त्री शिक्षण, सामाजिक समता व राष्ट्रनिर्मितीच्या मूल्यांची जाणीव निर्माण झाली.

