लोकशाहीचा उत्सव : खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी ४ जानेवारीला मतदान, ५ जानेवारीला मतमोजणी
![]()
लोकशाहीचा उत्सव : खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी ४ जानेवारीला मतदान, ५ जानेवारीला मतमोजणी
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर या नामांकित शैक्षणिक संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक २०२५ अंतर्गत मतदान प्रक्रिया रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी संस्थेच्या सर्व सभासद बंधू-भगिनींनी (पेट्रन / व्हाईस पेट्रन / फेलो) मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी एकूण १० मतदान बुथ उभारण्यात आले असून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी ७० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या निवडणुकीत एकूण ५,४९२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्र म्हणून प्रताप महाविद्यालय, अमळनेरची निवड करण्यात आली आहे.
मतदानास येणाऱ्या प्रत्येक मतदार सभासदाने सोबत मूळ आधार कार्ड व त्याची एक झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक आहे. ज्या सभासदांनी फोटो व आधार कार्डच्या झेरॉक्ससह फॉर्म संस्थेच्या कार्यालयात जमा केलेले नाहीत, अशा सभासदांनी एक पासपोर्ट साईज फोटो अनिवार्यपणे सोबत आणावा. ओळखीसाठी शासनमान्य ओळखपत्र (आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्ड इ.) ग्राह्य धरले जाणार आहे.
मतदान प्रक्रियेत अध्यक्ष पदासाठी १, विश्वस्त पदासाठी १ व उपाध्यक्ष पदासाठी २ मते देण्याचा अधिकार आहे. यापेक्षा अधिक मते दिल्यास मतपत्रिका बाद ठरणार आहे. तसेच कार्यकारी मंडळ सदस्य पदासाठी ८ मते देण्याचा अधिकार असून, अधिक मते दिल्यास संबंधित मतपत्रिका रद्द केली जाईल. मतदान प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधित व्यक्तीस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मतदारांना महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येईल. वाहन पार्किंगची व्यवस्था महाविद्यालयाच्या कार्यालयासमोरील प्रांगणात करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारातून संख्याशास्त्र विभागाकडून मतदान केंद्रात प्रवेश करून मतदानानंतर सायकल स्टँड बाजूच्या रस्त्याने किंवा प्रताप हॉस्पिटलसमोरील प्रवेशद्वारातून बाहेर जाण्याची व्यवस्था राहील, याची सर्व उमेदवार व मतदारांनी नोंद घ्यावी.
दरम्यान, मतमोजणी सोमवार दि. ५ जानेवारी २०२६ रोजी इंदिरा भवन, नगरपरिषदेसमोर, अमळनेर येथे सकाळी ९.०० वाजेपासून सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी ८ टेबल, ४८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, १००० मतांची एक फेरी याप्रमाणे एकूण झालेल्या मतदानानुसार मतमोजणीच्या फेऱ्या पार पडणार आहेत.
ही सर्व माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवडणूक उपसमितीचे चेअरमन श्री. पंडित रामचंद्र चौधरी व चिटणीस प्रा. पराग पाटील यांनी दिली आहे.

