आभार सभेतील भाषणाचा विपर्यास करून सोशल मीडियावर बदनामीचा प्रयत्न – मा. आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांचे स्पष्टीकरण
![]()
आभार सभेतील भाषणाचा विपर्यास करून सोशल मीडियावर बदनामीचा प्रयत्न – मा. आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांचे स्पष्टीकरण
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर नगरपरिषद निवडणुकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या आभार सभेत दिलेल्या भाषणाचा काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ काढत समाजमाध्यमांवर वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा गंभीर आरोप मा. आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांनी केला आहे. पराभव स्वीकारण्याचे धैर्य नसलेल्या विरोधकांकडून कोणताही ठोस पुरावा नसताना द्वेषभावनेतून अफवा व खोटे आरोप पसरवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मा. आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या स्पष्टीकरणात ठामपणे सांगितले की, आभार सभेत केलेल्या त्यांच्या कोणत्याही वक्तव्याचा उद्देश कोणत्याही स्त्रीचा, समाजाचा किंवा व्यक्तीचा अपमान करणे हा नव्हता आणि भविष्यातही कधीच राहणार नाही. “स्त्री ही माझ्या दृष्टीने सदैव माता व भगिनी समान असून, त्यांचा सन्मान राखणे ही माझी सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी नमूद केले.
विरोधकांनी भाषणातील काही शब्द संदर्भापासून तोडून-मोडून, काल्पनिक अर्थ लावून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यासंदर्भात जनतेला आवाहन करताना त्यांनी सांगितले की, पूर्ण भाषणाची क्लिप ऐकूनच मत व्यक्त करावे; अर्धवट किंवा कापलेल्या व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये.
मी कोणत्याही प्रकारच्या द्वेषमूलक, महिलांचा अनादर करणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विधानांना कधीही समर्थन दिलेले नाही आणि देणारही नाही, असे स्पष्ट करताना आमदार चौधरी म्हणाले की, अमळनेर शहरातील सामाजिक सलोखा, ऐक्य व परस्पर आदर टिकवणे हाच माझा मुख्य हेतू आहे आणि पुढेही तोच राहील.
वैयक्तिक द्वेषातून खोटी माहिती पसरवून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून, सत्य जनतेसमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अखेरीस, अमळनेरकर जनतेवर असलेला माझा विश्वास अढळ असून विकास, शांतता व सभ्यता हाच माझा मार्ग आहे, असे ठाम शब्दांत सांगत मा. आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांनी आपली भूमिका मांडली.




