खंडणीसाठी धमकी व बनावट माहिती प्रसारित; अमळनेर पोलिसांची कारवाई
![]()
खंडणीसाठी धमकी व बनावट माहिती प्रसारित; अमळनेर पोलिसांची कारवाई
अमळनेर प्रतिनिधी :
दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी अमळनेर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अशोक हरी खलाणे (रा. नेताजी चौक, चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून अनंत रमेश निकम (रा. श्रीकृष्ण कॉलनी, अमळनेर) याच्याविरोधात बीएनएस कायदा कलम ३०८ (२), ३०८ (३) अन्वये खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अशोक खलाणे हे महात्मा फुले सामाजिक शिक्षण विकास मंडळ, चाळीसगाव या संस्थेत सचिव पदावर कार्यरत असून संस्थेच्या अखत्यारित १४ अनुदानित व विनाअनुदानित शाळा व महाविद्यालये चालविली जातात. संस्थेअंतर्गत जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव येथे १५ शिक्षकांच्या गैरवर्तनामुळे शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची सेवा समाप्तीचे आदेश फिर्यादी यांनी दिले होते.
या कारवाईचा राग मनात धरून संबंधित शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे संस्थेविरोधात तक्रारी दाखल केल्या. त्यातून संस्थेवर प्रशासक नियुक्तीचे आदेश मिळवण्यात आले होते. मात्र या आदेशाविरोधात फिर्यादी यांनी मा. उच्च न्यायालयात दाद घेत प्रशासक नियुक्तीला स्थगिती मिळवली होती. तसेच फिर्यादी यांच्याविरोधात दाखल असलेल्या प्रकरणात त्यांनी जामीनही मंजूर करून घेतला होता. सध्या संबंधित प्रकरणे न्यायप्रविष्ट असतानाच आरोपीने गुन्हेगारी कृत्ये केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दिनांक ०८ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपी अनंत रमेश निकम याने फेसबुकवरील “अनंत निकम” या प्रोफाईलवरून फिर्यादी व त्यांच्या संस्थेबाबत खोटी व बनावट माहिती प्रसारित केली. त्यानंतर ०९ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपीने आपल्या साथीदारांमार्फत फिर्यादी यांना अमळनेर येथे बोलावून २५ लाख रुपयांची खंडणी मागितली.
खंडणीची रक्कम न दिल्यास फिर्यादी यांच्याविरोधात खोटी माहिती, बनावट व्हिडीओ तयार करून प्रसारित करणे, तसेच दखलपात्र व अजामीनपात्र गुन्ह्यांत अडकवून आयुष्यभर तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, नगराज चिंतामण वाघ यांच्यामार्फत रक्कम कमी करण्याबाबत चर्चा केल्यानंतर आरोपीने ४ ते ५ लाख रुपये देणे भाग आहे, असा दबाव टाकला.
या सततच्या धमक्या व खंडणीच्या मागणीमुळे अखेर फिर्यादी यांनी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अनंत रमेश निकम यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सो. यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.

