“व्याकरण म्हणजे अर्थपूर्ण शब्दांची निर्मिती” — डॉ. जितेंद्र पाटील यांचे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा तिसरा दिवस उत्साहात; ४५ विद्यार्थ्यांचा सहभाग
![]()
“व्याकरण म्हणजे अर्थपूर्ण शब्दांची निर्मिती” — डॉ. जितेंद्र पाटील यांचे प्रतिपादन
स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा तिसरा दिवस उत्साहात; ४५ विद्यार्थ्यांचा सहभाग
अमळनेर प्रतिनिधी— खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग सेंटरतर्फे दि. २८ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत “स्पर्धा परीक्षा आणि व्याकरण” या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत डॉ. जितेंद्र पाटील व डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख प्रा. विजय तुंटे यांनी मान्यवरांचे स्वागत व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
डॉ. जितेंद्र पाटील यांनी इंग्रजी व्याकरणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, इंग्रजी व्याकरण हे केवळ स्पर्धा परीक्षांसाठीच नव्हे तर दैनंदिन जीवनातही अत्यंत उपयुक्त आहे. व्याकरण हा विषयाचा आत्मा असून त्याच्या योग्य आकलनातून अर्थपूर्ण शब्दांची निर्मिती होते. कर्ता, क्रियापद, वाक्यरचना, काळ यांची शास्त्रीय मांडणी करत त्यांनी काळाचे १२ प्रकार, have, has, do, does यांचा योग्य वापर स्पष्ट केला. तसेच मागील वर्षांच्या व मॉडेल प्रश्नपत्रिकांचा सराव, प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न अभ्यास, वेळेत पेपर सोडवण्याचा सराव व चुकांची नोंद ठेवण्यासाठी “मिस्टेक बुक” तयार करण्याचा सल्ला दिला.
दुसरे व्याख्याते डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी मराठी व्याकरणावर मार्गदर्शन करताना सांगितले की, व्याकरण केवळ परीक्षापुरते मर्यादित नसून ज्ञानाचे आकलन व्याकरणाद्वारेच परिपूर्ण होते. भाषा ही माणूस घडविण्याचे प्रभावी साधन आहे. त्यांनी मारुती चितमपल्ली यांच्या पक्ष्यांच्या सांकेतिक भाषांवरील कथांचे उदाहरण देत वर्णविचार, शब्द, रूपविचार, वाक्यरचना, संधी, समास, अलंकार व शुद्धलेखन यांचे सविस्तर विवेचन केले. वर्णमाला ही ध्वनींची रचना असून त्यातून शब्द व वाक्य आकार घेतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेस प्रा. विजय तुंटे यांच्यासह एकूण ४५ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. अमित पाटील, प्रा. विजय साळुंखे, डॉ. बालाजी कांबळे, प्रा. हिमांशू गोसावी, पराग रविंद्र पाटील, तुषार पाटील, सुरेशराव सोनवणे व चंद्रकला चौधरी यांनी सहकार्य केले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार संयोजक प्रा. विजय साळुंखे यांनी मानले.

