खरा धर्म म्हणजे प्रेमाचा प्रसार — साने गुरुजी जयंतीनिमित्त देवगाव देवळी येथे भावपूर्ण अभिवादन
![]()
खरा धर्म म्हणजे प्रेमाचा प्रसार — साने गुरुजी जयंतीनिमित्त देवगाव देवळी येथे भावपूर्ण अभिवादन
अमळनेर प्रतिनिधी :
देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये थोर समाजसुधारक, साहित्यिक व आदर्श शिक्षक पूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शाळेत सुसंस्कृत व प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन हे होते. त्यांनी पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून माल्यार्पण केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी साने गुरुजींच्या विचारांची आणि कार्याची उजळणी केली.
“खरा तो एकच धर्म — जगाला प्रेम अर्पावे” हा संदेश देणारे साने गुरुजी आजही समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. प्रेम, करुणा, सत्य आणि सेवाभाव या मूल्यांवर आधारलेले त्यांचे जीवन प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले.
साने गुरुजींनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. गरिबांप्रती कणव, विद्यार्थ्यांवरील अपार प्रेम आणि राष्ट्रनिष्ठा या गुणांमुळे ते शिक्षकांचे आदर्श मानले जातात. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेचे शिक्षक आय. आर. महाजन, एस. के. महाजन, एच. ओ. माळी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील, गुरुदास पाटील उपस्थित होते. सर्वांनी साने गुरुजींच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या विचारांना आचरणात आणण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवण होत असून शाळेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

