विचारांची मशाल घेऊन चालणारा सत्यशोधक योद्धा : पी. डी. पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!!
1 min read

विचारांची मशाल घेऊन चालणारा सत्यशोधक योद्धा : पी. डी. पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!!

Loading

 

विचारांची मशाल घेऊन चालणारा सत्यशोधक योद्धा : पी. डी. पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!!

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात गिरणा नदीच्या काठावर वसलेल्या मांदुर्णे या छोट्याशा गावात, १६ डिसेंबर १९८३ रोजी एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रमोद धर्मराज पाटील, आज महाराष्ट्रभर सत्यशोधक पी. डी. पाटील म्हणून ओळखले जातात. शेतकरी धर्मराज पुंडलिक पाटील व सुंदरबाई पाटील या कष्टकरी माता-पित्यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिक्षणविचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत आपल्या सर्व मुलांना शिक्षणाची दिशा दिली. याच संस्कारांचे फळ म्हणजे आज या कुटुंबातील तिन्ही भावंडे शिक्षण क्षेत्रात शिक्षक व प्राध्यापक म्हणून समाजसेवा करीत आहेत.
पी. डी. पाटील यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण मांदुर्णे व पिलखोड येथे झाले. त्यानंतर त्यांनी चाळीसगाव येथे बी.ए. पदवी पूर्ण करत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पदवी प्राप्त केली. पुढे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत जिजाऊ शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ येथून बी.एड. ही व्यावसायिक पदवी संपादन केली.
१ ऑगस्ट २००७ रोजी त्यांनी महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथे उपशिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. याच शाळेतील समृद्ध ग्रंथालयाने त्यांच्या आयुष्यात पुस्तकप्रेमाची खरी बीजे रोवली.
धरणगाव येथे त्यांना विचारशील मित्रांचा गोतावळा लाभला आणि इथूनच त्यांच्या वैचारिक प्रवासाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. त्यांनी बामसेफ संघटनेचे तालुकाध्यक्षपद स्वीकारून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित सामाजिक वाटचाल सुरू केली. या प्रवासात हेमंत माळी सर, आबासाहेब राजेंद्र वाघ, लक्ष्मणराव पाटील, गोरख देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शाळेतील विविध उपक्रमांत ते नेहमीच अग्रभागी राहिले. निबंध, चित्रकला, रंगभरण, वक्तृत्व व भाषण स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना घडवताना महापुरुषांच्या जीवनचरित्रांचे संस्कार त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात रोवले. याच कार्यातून त्यांच्या प्रबोधन कार्याची सुरुवात झाली. पुढे धरणगाव तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अनेक व्याख्यानमालांचे आयोजन करून त्यांनी शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, तसेच माँसाहेब जिजाऊ, अहिल्यामाई होळकर, सावित्रीमाई फुले, रमाई आंबेडकर व फातिमाबी शेख यांच्या विचारांना घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या या सामाजिक-शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना आजवर तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील एकूण १३ आदर्श पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी महात्मा फुले ब्रिगेड या संघटनेत जिल्हा संघटक म्हणून काम केले असून सध्या ते सत्यशोधक समाज संघ, जळगाव चे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते सत्यशोधक विवाह, गृहप्रवेश व दशपिंडविधी सातत्याने पार पाडत असून जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १०० हून अधिक सत्यशोधक विधी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले आहेत.

पुस्तकांवरील प्रेमातूनच २०१८ मध्ये ‘सत्यशोधक पुस्तक चळवळ’ या अभिनव उपक्रमाची स्थापना धरणगाव येथे करण्यात आली. आजवर जवळपास दहा हजार पुस्तकांचे मोफत वाटप त्यांनी केले आहे. त्यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे स्वागत पुस्तक देऊन केले जाते. वाढदिवस, विवाहसोहळे, सण-उत्सव अशा प्रत्येक प्रसंगी महापुरुषांचे विचार पुस्तकांच्या माध्यमातून पसरवण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. म्हणूनच धरणगाव शहरात ते प्रेमाने ‘पुस्तक मित्र’ म्हणून ओळखले जातात.
शैक्षणिक संघटनांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असून ते महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) चे तालुका उपाध्यक्ष तसेच हिंदी अध्यापक मंडळ, धरणगाव चे तालुका कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या नायगाव येथील जन्मस्थानी त्यांच्या “आदर्श महामाता” या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले असून या पुस्तकाच्या आतापर्यंत ४,००० प्रती महाराष्ट्रभर पोहोचल्या आहेत.
पत्रकारितेच्या माध्यमातूनही त्यांनी समाजासाठी आपली लेखणी झिजवली आहे. धरणगाव अधिकृत पत्रकार संघाचे सदस्य म्हणून कार्यरत असताना, संपादक ईश्वर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ते मराठी लाईव्ह न्युज व पुरोगामी संदेश या पोर्टलचे तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. यासोबतच संत सावता माळी समाज सुधारणा पंच मंडळ, मोठा माळीवाडा धरणगाव येथे ते सल्लागार पंच म्हणूनही कार्यरत आहेत.

येत्या ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या सत्यशोधक समाज संघाच्या ४३ व्या राज्य अधिवेशनात, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित “आपले प्रेरणास्थान” हे त्यांचे नवे पुस्तक प्रकाशित होत आहे.
विचार, कृती आणि पुस्तकांच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची मशाल पेटवणाऱ्या मा. पी. डी. पाटील सरांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांचे कार्य अधिक व्यापक व्हावे, हीच सदिच्छा.

मा. पी. डी. पाटील सर – पदे व जबाबदाऱ्या

▪️ जिल्हाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ, जळगाव
▪️ जिल्हा संघटक – महात्मा फुले ब्रिगेड, जळगाव
▪️ संस्थापक अध्यक्ष – सत्यशोधक पुस्तक चळवळ, धरणगाव
▪️ माजी तालुकाध्यक्ष – बामसेफ
▪️ तालुका उपाध्यक्ष – महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (TDF), धरणगाव
▪️ तालुका कोषाध्यक्ष – हिंदी अध्यापक मंडळ, धरणगाव
▪️ सल्लागार पंच – संत सावता माळी समाज पंच मंडळ, मोठा माळीवाडा, धरणगाव
▪️ तालुका प्रतिनिधी – मराठी लाईव्ह न्युज, धरणगाव
▪️ तालुका प्रतिनिधी – पुरोगामी संदेश, न्यूज नेटवर्क, धरणगाव

शुभेच्छुक :
ईश्वर आर. महाजन
पत्रकार, अमळनेर
📞 9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *