नारीशक्तीच्या बळावर दहिवदचा कायापालट; कामातून नेतृत्व सिद्ध करणाऱ्या सुषमाताई देसले-पाटील , प्रसिद्धी नव्हे तर प्रामाणिक श्रम—पाणी, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरणातून गावाला राज्यपातळीवर नेणारा विकासाचा आदर्श
![]()
नारीशक्तीच्या बळावर दहिवदचा कायापालट; कामातून नेतृत्व सिद्ध करणाऱ्या सुषमाताई देसले-पाटील
प्रसिद्धी नव्हे तर प्रामाणिक श्रम—पाणी, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरणातून गावाला राज्यपातळीवर नेणारा विकासाचा आदर्श
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन):
“आधी केलं, मग सांगितलं”—या तत्त्वावर ठाम राहून दहिवद गावाचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या आदर्श प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमाताई देसले-पाटील यांनी नारीशक्तीच्या बळावर गावाचा चेहरा-मोहरा बदलून दहिवदला राज्यपातळीवर ओळख मिळवून दिली आहे. केवळ जाहिरातबाजी, खोट्या प्रसिद्धीसाठी फोटोसेशन किंवा जनतेची दिशाभूल न करता प्रत्यक्ष श्रम, नियोजन आणि लोकसहभागातून विकासकामांचा ठसा उमटवणे, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरले आहे.
गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल ४५ दिवस माती फेकणे, स्मशानभूमीत श्रमदान करणे, तसेच दहिवद ते रुंधाटी–मुंगसे गावांच्या तापी नदीपात्रात ८ ते १० किलोमीटर पायी चालून अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष सर्वेक्षण करून तापी नदीवरून पाईपलाईन गावापर्यंत आणण्याचा मार्ग मोकळा करणे, ही कामे त्यांच्या कार्यातील मैलाचे दगड ठरले. एसी घर-कारचा आराम बाजूला ठेवून रखरखत्या उन्हात श्रमदान व मेगा वृक्षारोपण करत त्यांनी दहिवदच्या मातीत खर्या अर्थाने “भूमिपुत्री” असल्याचे सिद्ध केले आहे.
वृक्षलागवड व संगोपनासाठी पंधरा दिवस संपूर्ण गावठाण पिंजून काढत पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला. विशेष म्हणजे, आपल्या वैयक्तिक कामांसाठी, कार्यक्रमांसाठी किंवा वृक्षसंगोपनासाठी महिला भगिनींचा किंवा पदाचा कधीही गैरवापर न करता त्यांनी सार्वजनिक जीवनातील शुचिता जपली.
महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि रोजगारनिर्मितीसाठी त्या सदैव प्रयत्नशील राहिल्या. तालुका व जिल्हा पातळीवरील प्रशिक्षणासाठी महिलांना पुढे करून, विविध योजनांची माहिती देत “गाव समृद्ध कसं करावं” याची दिशा दिली.
वृक्ष लागवड व संवर्धनातून शेकडो महिलाना नियमीत रोजगार उपलब्ध करून देवून महिला सक्षम व प्रबळ करण्याचे कार्य सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेवून केले आहे
गाव विकासाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये महिलांचा समावेश करून त्यांना सक्षम करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. दहिवदच्या भूमीत महिला सक्षमीकरणाची पहिली बीजे रोवण्याचे श्रेय त्यांच्याच कार्याला जाते, याचा त्यांना अभिमान आहे.
याच उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जागृत व ज्ञानी जनतेने सौ. सुषमाताई देसले-पाटील यांना कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथे संचालक पदावर निवडून दिले आहे. त्या सध्या
आदर्श प्रथम लोकनियुक्त सरपंच, दहिवद,
संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर,
विभागीय अध्यक्ष, सरपंच परिषद, मुंबई (महाराष्ट्र)
या पदांवर कार्यरत आहेत.
दहिवदच्या विकासाची ही यशोगाथा केवळ एका गावापुरती मर्यादित न राहता, नारीशक्तीच्या सहभागातून गावोगाव परिवर्तन शक्य आहे हा विश्वास निर्माण करणारी ठरत आहे.

