विधानपरिषद सभागृहातील संघर्ष, विचार आणि निर्णयांचा ठेवा पुस्तकातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*  *विधानपरिषदेत घडलेल्या गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*  *वरिष्ठ सभागृहातील चर्चांमधून कायद्यांना मिळाले वैचारिक बळ; ऐतिहासिक ग्रंथ ठरणार मार्गदर्शक – सभापती प्रा. राम शिंदे*
1 min read

विधानपरिषद सभागृहातील संघर्ष, विचार आणि निर्णयांचा ठेवा पुस्तकातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी* *विधानपरिषदेत घडलेल्या गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *वरिष्ठ सभागृहातील चर्चांमधून कायद्यांना मिळाले वैचारिक बळ; ऐतिहासिक ग्रंथ ठरणार मार्गदर्शक – सभापती प्रा. राम शिंदे*

Loading

*विधानपरिषद सभागृहातील संघर्ष, विचार आणि निर्णयांचा ठेवा पुस्तकातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*

*विधानपरिषदेत घडलेल्या गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

*वरिष्ठ सभागृहातील चर्चांमधून कायद्यांना मिळाले वैचारिक बळ; ऐतिहासिक ग्रंथ ठरणार मार्गदर्शक – सभापती प्रा. राम शिंदे*

*“विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे”* या ग्रंथाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते प्रकाशन

नागपूर, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून या ऐतिहासिक सभागृहाच्या शंभर वर्षांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण कायदे, ठराव व धोरणांचा दस्तऐवज म्हणून संदर्भसमृद्ध द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन आज नागपूर येथील विधानपरिषद सभागृहात करण्यात आले. वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या *“विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे”* या ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते झाले. या वेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत संमत झालेली विधेयके, ठराव आणि धोरणे हे केवळ कायदे नसून सामाजिक परिवर्तनाचे ऐतिहासिक दस्तऐवज असल्याचे नमूद केले. रोजगार हमी योजना, अंधश्रद्धा निर्मूलन, मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार, सामाजिक न्यायाशी संबंधित कायदे यावरील चर्चांचा समावेश असलेला हा ग्रंथ भविष्यातील अभ्यासकांसाठी अमूल्य ठेवा ठरेल, असे त्यांनी सांगितले. नागपूर हिवाळी अधिवेशनात या ग्रंथाचे प्रकाशन होणे हे ऐतिहासिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

*नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र विधानपरिषदेतील प्रदीर्घ संसदीय प्रवासाला उजाळा देताना या सभागृहाचे वेगळेपण अधोरेखित केले. विधानपरिषद हे केवळ नियमांवर चालणारे सभागृह नसून, प्रथा, परंपरा, मूल्ये आणि विचारप्रवर्तक चर्चांवर चालणारे वरिष्ठ सभागृह असल्याचे त्यांनी नमूद केले. विरोधी पक्षनेते म्हणून काम करत असताना पाणीप्राधान्य, सिंचन, वाहतूक, विदर्भ-मराठवाडा अनुशेष, इथेनॉल धोरण यांसारख्या विषयांवर सातत्याने चर्चा घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वेळा प्रश्न, लक्षवेधी व नियमांच्या आधारे सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले गेले आणि त्यामुळे सामान्य जनतेच्या हिताचे धोरणात्मक बदल घडू शकले, असा अनुभव त्यांनी मांडला. सभागृहातील तीव्र वादविवाद असूनही वैयक्तिक कटुता न ठेवता लोकशाही मूल्यांचे पालन ही महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेची मोठी ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भूतकाळातील चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे भविष्यातील लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल, असे सांगत या ग्रंथाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

*विधानपरिषद म्हणजे गुणवत्तापूर्ण चर्चांचे व्यासपीठ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेतील चर्चांची गुणवत्ता अधोरेखित केली. सरकार आणि विरोधकांमधील तीव्र वादविवाद असूनही सभागृहाबाहेर सौहार्द टिकून राहणे ही महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेची खासियत असल्याचे त्यांनी सांगितले. नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला सातत्याने सजग ठेवले, याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. विधानपरिषदेत झालेल्या चर्चांमुळे अनेक परिवर्तनकारी कायदे आकारास आल्याचे त्यांनी नमूद केले. हा ग्रंथ लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण संदर्भ ठरेल, असे त्यांनी सांगितले.

*वरिष्ठ सभागृहाची भूमिका कायद्यांना परिपूर्ण बनवणारी – सभापती राम शिंदे*

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या भाषणात विधानपरिषदेला विचारप्रवर्तक आणि गुणवत्तापूर्ण चर्चांचे वरिष्ठ सभागृह असल्याचे सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन, रोजगार हमी, संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा यांसारख्या महत्त्वपूर्ण कायद्यांमध्ये विधानपरिषदेच्या सूचनांमुळे कायदे अधिक परिणामकारक झाले, असे त्यांनी नमूद केले. शतक महोत्सवानिमित्त प्रकाशित झालेला हा ग्रंथ राज्यशास्त्राचे विद्यार्थी, अभ्यासक आणि लोकप्रतिनिधींसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श – अध्यक्ष राहुल नार्वेकर*

कार्यक्रमाचा समारोप करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या समृद्ध संसदीय परंपरेचे कौतुक केले. नियमांसह मूल्ये आणि प्रथांवर आधारित कामकाजामुळे हे सभागृह देशभर आदर्श मानले जाते, असे ते म्हणाले. नितीन गडकरी यांच्या संसदीय भाषणांचा आजही संदर्भ दिला जातो, हे त्यांच्या योगदानाचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले. या ग्रंथाचा अभ्यासक व विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त प्रकाशित झालेला हा द्वितीय ग्रंथ लोकशाहीच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचे दस्तऐवजीकरण करणारा ठरणार आहे. भविष्यातील लोकप्रतिनिधी, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ प्रेरणादायी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

*कार्यक्रमाची लिंक :*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *