संविधानाची ओळख, जागरूकतेचा संकल्प—नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा पातोंड्यात उपक्रम”
![]()
“संविधानाची ओळख, जागरूकतेचा संकल्प—नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा पातोंड्यात उपक्रम”
अमळनेर प्रतिनिधी –
श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील विद्यार्थिनींनी संविधान दिनाच्या निमित्ताने पातोंड्यात एक प्रशंसनीय उपक्रम राबवित समाजजागृतीचा सुंदर संदेश दिला.
यामिनी माळी, गायत्री माळी, प्राजक्ता बाळासाहेब गौडे, मयुरी महेंद्र करंकाळ, रत्ना खैरनार आणि जान्हवी या विद्यार्थिनींनी श्री दत्त विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालय, पातोंडा येथे विद्यार्थ्यांशी संविधान उद्देशिकेबाबत संवाद साधला.
संविधानाची मूलभूत तत्त्वे, त्यातील मूल्यांची ओळख, नागरिकांची जबाबदारी आणि लोकशाहीची पायाभूत रचना—या विषयांवर विद्यार्थिनींनी प्रभावीपणे माहिती सादर केली. सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना अत्यंत आवडले.
या उपक्रमादरम्यान माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी
संविधान उद्देशिकेसोबत छायाचित्रे काढली तसेच संविधान शपथही उत्साहाने ग्रहण केली.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना आणि संविधानाप्रती आदर अधिक दृढ झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
विशेष म्हणजे, नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी संविधान समितीतील 15 महान महिलांचे प्रेरणादायी पोस्टर शाळेला भेट दिले.
या पोस्टरमधून भूमिका बजावणाऱ्या महिलांचे योगदान, त्यांच्या संघर्षकथा आणि त्यांनी घडविलेल्या इतिहासाची झलक विद्यार्थ्यांना पाहायला मिळाली. शाळेतील शिक्षकांनी या भेटीचे मनापासून कौतुक केले.
समाजकार्य महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दलची समज, जागरूकता आणि आदराची भावना अधिक दृढ झाली—हीच या उपक्रमाची मोठी कमाई ठरली.

