संविधानाचा अभिमान… ज्ञान, संस्कार आणि मूल्यांचा अनोखा पर्व : इंदिरा गांधी विद्या मंदिरमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
1 min read

संविधानाचा अभिमान… ज्ञान, संस्कार आणि मूल्यांचा अनोखा पर्व : इंदिरा गांधी विद्या मंदिरमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

Loading

संविधानाचा अभिमान… ज्ञान, संस्कार आणि मूल्यांचा अनोखा पर्व : इंदिरा गांधी विद्या मंदिरमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस अत्यंत भव्य, शैक्षणिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संविधानाचे महत्व विद्यार्थीपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे, त्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम व संविधानभक्ती रुजावी, या हेतूने संवेदनशील आणि उपक्रमशील व्यक्तिमत्व म्हणून श्री विजय नाना पाटील आर्मी स्कूलचे शिक्षक, पत्रकार उमेश प्रतापराव काटे यांना प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शनासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात अतिथी उमेश काटे सर यांच्या शुभहस्ते भारतीय संविधान प्रास्ताविक, संविधानाची प्रत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या महागुरू महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरित्रग्रंथांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप पवार सर होते.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आला होता. यात संत, समाजसुधारक, क्रांतिकारक, विचारवंत, ‘शिक्षक कसा असावा?’ अशा विविध विषयांवरील शंभरांहून अधिक पुस्तकांची आकर्षक मांडणी होती. पुस्तक प्रदर्शनाचे अवलोकन करताना अतिथी काटे सर यांनी विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीची प्रक्रिया, संविधानसभा, त्यातील प्रमुख सदस्यांचे कार्य, भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, मूलभूत हक्क–कर्तव्यांची महती यांचे सोप्या आणि प्रेरक भाषेत मार्गदर्शन केले.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी संविधानावर आधारित प्रश्नोत्तर स्पर्धा घेण्यात आली. दोन प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या चरित्र पुस्तके व पेन देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत चेतना पंकज कोळी, प्रतीक्षा नामदेव कुंभार, रिया गणेश धनगर, रिमांशू राम साळुंखे आणि सोनू संजय पारधी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बक्षिसे पटकावली.
कार्यक्रमातील सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला—
“माझा देश – माझा अभिमान – माझे संविधान”
हा अनोखा सेल्फी पॉईंट!
विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, पालक आणि प्रमुख पाहुणे यांनी येथे सेल्फी काढत संविधानाबद्दलचा अभिमान व्यक्त केला. आधुनिक माध्यमातून संविधानाची ओळख अधिक दृढ करण्याचा हा अभिनव उपक्रम सर्वांना भावला.
यावेळी प्रमुख अतिथी श्री उमेश काटे यांना नुकताच महाराष्ट्र राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते व्हॉईस ऑफ मीडिया उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांचा स्नेहवस्त्र, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरव केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सौ. बी.एस. चव्हाण, सौ. सी.एस. पाटील, ए.यू. महाजन, श्रीमती एस.एस. तेले तसेच शिक्षक श्री पी.एम. ठाकरे, व्ही.डी. पाटील, ए.पी. जाधव, वाय.जे. पाटील, डी.एस. माळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आकर्षक सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक श्री डी. ए. सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमानंतर शिक्षक–शिक्षिकांसाठी चहापानाची व्यवस्था होती. संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचारी श्री राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले.
संविधान दिनानिमित्त असा उपक्रमशील, ज्ञानमय आणि मूल्याधिष्ठित कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनावर अमिट छाप सोडणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *