जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या अडचणी तातडीने सोडवा — राज्य सरचिटणीस रामकृष्ण बी. पाटील यांची ठाम मागणी
![]()
जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या अडचणी तातडीने सोडवा — राज्य सरचिटणीस रामकृष्ण बी. पाटील यांची ठाम मागणी
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित अडचणी सोडवण्यासाठी युनियनकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असतानाही जिल्हा आरोग्य विभागाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आशा ताईंमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. वाढत्या असंतोषाची दखल घेत युनियनचे राज्य सरचिटणीस रामकृष्ण बी. पाटील यांनी आरोग्य भवन, मुंबई येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक (अतांत्रिक) मा. राजेंद्र भालेराव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आशा सेविकांना न्याय मिळावा आणि त्यांच्या तातडीच्या अडचणी सोडवाव्यात यासाठी सविस्तर चर्चा या वेळी झाली.
आशा स्वयंसेविकांच्या मूलभूत मागण्या
आशा ताईंना त्यांच्या रोजच्या कामाचा मोबदला नियमित मिळावा, केंद्र शासनाचा थकीत मानधन त्वरित अदा व्हावा, तसेच कोविड काळात जोखीम पत्करून केलेल्या कामाचा प्रोत्साहन भत्ताही तात्काळ देण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या युनियनने मांडल्या. जिल्ह्यातील सर्व आशा ताईंना दरमहा वेतन चिट्ठी देण्यात यावी, ऑनलाइन कामाची सक्ती थांबवून डिजिटल भार कमी करावा, आरोग्य वर्धिनी योजनेतील मोबदल्यात कपात होऊ नये, तसेच जननी सुरक्षा योजनेचा थकीत मानधन तत्काळ देऊन पुढे दरमहा मिळावे, या तातडीच्या मुद्द्यांवरही युनियनने जोर दिला. कार्यरत आशा ताईंना जिओ-टॅग फोटोची बेकायदेशीर सक्ती बंद करण्याची मागणीही निवेदनात नमूद करण्यात आली.
निवेदनाचा विचार करताना मा. राजेंद्र भालेराव यांनी सादर केलेल्या सर्व मागण्यांची तीव्रता लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन दिले. युनियनच्या या प्रयत्नामुळे आशा स्वयंसेविकांच्या समस्यांवर लवकरच ठोस निर्णय अपेक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

