भावना, वास्तव आणि माणुसकीचा संगम — ‘अवतरण चिन्ह’ कवितासंग्रहाचे दर्शन
![]()
मनात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या सजग कविता.. ‘ अवतरण चिन्ह ‘
‘अवतरण चिन्ह ‘या कवी प्रवीण
बोपुलकर यांच्या कविता संग्रहात कविता, गझल ,गीत किंवा काही गझल सदृश्य रचना असा सगळा संमिश्र प्रवाह वाचायला मिळतो.
महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या कविता आशयगर्भ आहेत .प्रवीण बोपुलकरांना संवेदनांची चांगली जाणीव आहे आणि या संवेदनांचा सजग आलेख या सर्व कवितासंग्रहात पाहायला मिळतो.
आयुष्याच्या अनेक भावनांना स्पर्श करणाऱ्या कविता यामध्ये आहेत.
त्याचबरोबर जागतिकीकरण त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न याचंही प्रतिबिंब त्यांच्या कवितेमध्ये पाहायला मिळते.
महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या खूपशा कवितेत
एक लय आहे आणि ती लय त्यांच्या कवितांना वेगळं सौंदर्य देऊन जाते.
कवितेमध्ये कवीचे वैयक्तिक अनुभव उतरत असतातच. त्याने पाहिलेला भोवताल, घटना, माणसं ,निसर्ग या सर्वांचे प्रतिबिंब त्यात उमटणं स्वाभाविक आहे.
प्रवीण बोपुलकर यांची कविता अस्वस्थ करणारी आहे आणि अर्थपूर्ण तर आहेच पण उत्तम अभिव्यक्ती असणारी आहे. त्यामुळे ती दर्जात्मक दृष्ट्या उत्तम ठरणारी आहे.
या संग्रहात जवळपास एकसष्ठ कविता आहेत आणि त्या वेगळ्या वेगळ्या विषयावरच्या आहेत .शेतकऱ्यांच्या दुःखापासून स्त्रीच्या वेदनेपर्यंत ते निसर्गापासून जागतिकीकरणापर्यंत एक मोठा व्यापक पट आपल्याला यात जाणवतो.
दुःखासोबत करून मैत्री हसणे शिकूया
नवा घडवूया जीवनामध्ये संकर आपण
यासारखी कविता वैश्विक प्रबोधन करणारी वाटते .
खोल तळाशी हृदयामध्ये झरा गवसला माणुसकीचा
जेंव्हा जेंव्हा अहंपणाच्या गाळाला मी उपसत गेलो
माणसा मधला अहंकार हा माणसाच्या नाशाला कारणीभूत ठरतो.माणसापासून तो माणसाला दूर करतो अशावेळी हृदया मधली माणुसकी सापडली, जागवली तरच या अहंकारापासून मुक्ती मिळू शकते.
माणसाच्या स्वार्था मुळे माणसाने सिमेंटची जंगले निर्माण केली आणि त्यामुळे मग चिमणी सारखा पक्षी हल्ली दिसेनासा झाला आहे. खंत व्यक्त करताना मुक्तछंदात ते म्हणतात
दाणे टाकून अडकवणारी
ही स्वार्थी जमात
संपवतेय आपलं अस्तित्व
आणि करतेय आपल्याला
‘ जागतिक चिमणी दिवस ‘
साजरं करण्यापुरतं आणि
‘ एस फोर स्पॅरो ‘
बाराखडीपुरतं मर्यादित.
आज काल सगळी तरुण पिढी कामाच्या निमित्ताने शहराकडे जाते आहे. जागतिकीकरणांमध्ये खेडी रिकामी होऊ लागली आहेत आणि मग खेड्यातली वृद्ध माणसं कुठेतरी एकाकी पडत आहेत हे व्यक्त करताना ‘अक्षरलेणी ‘ या कवितेत ते म्हणतात
ओट्यावरती कोणाचेही येणे जाणे नसते हल्ली
दुःख गावचे म्हातारा वड पारंब्यांना सांगत असतो
आम्ही माणसं भिंती बांधत गेलो, रंगांनाही धर्मामध्ये वाटत गेलो आणि निर्माण झालं माणसा माणसात
तुटलेपण. ‘भाऊबंदकी ‘ या कवितेमध्ये त्यांनी हे मांडताना म्हटलं आहे.


वीट मुळात ठिसूळ
मात्र त्या विटेला वेगवेगळे
रंग लावून आम्ही बांधल्यात
मना मनात टणक भिंती
खरंतर एकाच भट्टी तयार झालेली वीट मंदिर, मशिद, विहार, गुरुद्वारा ,चर्च अशा वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जाते .तिचा धर्म जर समान असेल तर माणसाने तिच्यात रूपाने भाऊबंदकी का निर्माण करावी. त्यात परमेश्वर एकच आहे हे मनात मान्य करायला पाहिजे जाती धर्म हे माणसाने निर्माण केले आहेत .
शेतकऱ्यांचे दुःख मांडताना ‘शेतकऱ्या बद्दल या कवितेमध्ये कवी म्हणतो
तोच असतो भाव आमचा बांधलेला बारमाही
कैक गेले याचसाठी वा बदलले रोज शासन
आजचं वास्तव या कवितेच्या निमित्ताने कवीने वाचकांच्या समोर मांडले आहे. अजूनही आंदोलने चालू आहेत, शेतकरी मालाला ठाम भाव मिळत नाही म्हणून झगडतो आहे .शासनं बदलत आहेत .
माणसा माणसातील विषमता, वाद माणसाला एकमेकापासून तोडत आहे.
संतांनी सांगितलेली समता यापासून माणूस दूर झालेला आहे.असं वास्तव पाहून कवी म्हणतो
सगळेच रंग आता रंगाध फार झाले
तो एकटा तिरंगा छातीस बांधतो मी
माणसापासून दुरावणारा माणूस एकमेकांना जोडण्याचं काम बोपुलकर त्यांच्या कवितेमधून करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जाणवत राहते.
बोपुलकर स्वतः ग्रामीण भागातून शहरात आल्यामुळे त्या मातीशी असणारी त्यांची नाळ अजून जुळली आहे. तिथल्या समस्या त्यांना जाणवतात .खेड्यातलं बदलणारे वास्तव त्यांच्या ध्यानी येतं म्हणून ते लिहितात
लाज वाटते काम कराया शेतामधले
शिकल्यानंतर हीच तुझी तर अडचण आहे
ग्रामीण भागातील मुले थोडंफार शिकल्यावर त्यांना शेतामध्ये काम करायला नको वाटते अन धड नोकऱ्याही लागत नाही अशा विचित्र परिस्थितीमध्ये अडकतात ही कविता त्याचं प्रतिबिंब आहे.
सगळा भवताल बदलतो आहे एक प्रकारचं सपाटीकरण जाणवत आहे.
सर्वच क्षेत्रांमध्ये एक प्रकारची घुसमट आहे .व्यवस्थेबद्दल त्यांच्या मनात असणारी भिती ते ‘ भिती ‘ या कवितेतून व्यक्त करतात
किती दिवस मी सहन करावे व्यवस्थेतल्या गळचेपीला
धगधगणाऱ्या विद्रोहाच्या उफाळण्याची भिती वाटते
कर्जबाजारीपण आर्थिक अनावस्था यातून काही वेळा माणूस हतबल होतो. ‘किंचाळी ‘ही कविता म्हणजे गहाण ठेवलेल्या मंगळसूत्रांचं आत्मकथनच आहे
आज गहाण पेटीतून कानावर
गुदमरणाऱ्या श्वासासोबत
एक आर्त किंचाळी
बाहेर पडली
‘ आता भेटून वर्षे झालीत
माझ्या मालकिणीला,
त्या गळ्याची खूप
आठवण येत आहे ‘
उघडून पाहिले तर
हुंदके देऊन
मंगळसूत्र रडत होते.
कमी शब्दातली ही कविता खूप काही सांगून जाणारी आहे.
बोपुलकर यांच्या काही रचना गझल आहेत तर काही गझल सदृश्य आहेत, काही मुक्तछंदातल्या आहेत . पण त्यांच्या मधली आशयगर्भता आणि खोली ही वाचकांच्या मनाला
झिंझोडून टाकते.
वाचकांच्या मनात अस्वस्थता निर्माण करते. ही अस्वस्थता हे या सगळ्या कवितांचं यश आहे असं मला वाटतं.
या संग्रहाला प्रतिभा सराफ यांनी दिलेली प्रस्तावना संग्रहाची मर्मस्थले उलगडून दाखवणारी आहे.
माणसां बद्दल अपार स्नेह, माणुसकी जपणारा हा कवी आहे .माणसाच्या जगण्याचं सजग भान त्याला आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेमध्ये एक जिवंतपणा आहे ,वास्तवाचं उत्कट प्रतिबिंब आहे ,प्रबोधन आहे .
प्रवीण बोपुलकर यांचा हा संग्रह वाचकांना खूप काही देऊन जाणारा आहे. या ‘अवतरण चिन्ह ‘ मध्ये माणसाचं जगणं सामावलेलं आहे हे महत्त्वाचं.
बोपुलकरांचं मनोगत कविते पाठची भूमिका सांगणारे आहे त्यामुळे या कविता वाचकांच्या पर्यंत पोहोचायला मदत होते.
गझल लेखनाचे तंत्र त्यांना अवगत झालं आहे पण त्याचबरोबर मुक्तछंदातली
अर्थगर्भताही ते जाणतात .त्यामुळे या कविता एका उंचीवर गेल्या आहेत असं मला वाटतं.
त्यांच्या या कवितासंग्रहाने त्यांच्या पुढील लेखनाबद्दलच्या आशा खूपच उंचावल्या आहेत.
त्यांना मनापासून शुभेच्छा.
डॉ राजेंद्र माने,
सातारा

