कोकणात पावसाचा फटका; शेतकऱ्यांसाठी त्वरित पंचनामे व नुकसान भरपाई आवश्यक शिक्षक आमदार म्हात्रे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
![]()
कोकणात पावसाचा फटका; शेतकऱ्यांसाठी त्वरित पंचनामे व नुकसान भरपाई आवश्यक
शिक्षक आमदार म्हात्रे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई प्रतिनिधी
कोकण विभागातील शेतकरी परतीच्या अवकाळी पावसामुळे गंभीर संकटात आले आहेत. शिक्षक आमदार श्री. ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे विनंती केली आहे की, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणातील शेतक-यांचे तांदळाचे व इतर शेती पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी.
आमदार म्हात्रे यांनी पत्रात नमूद केले आहे की, या विभागातील बहुतेक शेतकरी आदिवासी, डोंगराळ व सागरी भागातील असून, शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आणि उपजीविकेचे साधन आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी मेहनतीने तांदूळ, पालेभाज्या आणि फळे पिकवली आहेत. परंतु, ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचा मोठा नाश झाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह संकटात आला असून, आर्थिक व मानसिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे पिक पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, त्यांचे घरगुती आणि शेतीसंबंधी उत्पन्न हळूहळू नष्ट होत आहे.
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सरकारकडे विनंती केली आहे की, प्रभावित जिल्ह्यांमध्ये तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. यामुळे शेतकऱ्यांना पुढील पिकांसाठी आवश्यक आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत चालू राहील.
आमदार म्हणतात, “पालघर, ठाणे, रायगड आणि कोकणातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने त्वरित पावले उचलली पाहिजेत, नाहीतर शेतकऱ्यांची आर्थिक आणि मानसिक अवस्था गंभीर होत जाईल.”

