अवकाळी पावसाने अमळनेर तालुक्यात हाहाकार – पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची आर्त हाक! , राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र गट) तर्फे प्रशासनाला तातडीने पंचनामे व मदतीची मागणी
![]()
अवकाळी पावसाने अमळनेर तालुक्यात हाहाकार – पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची आर्त हाक!
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र गट) तर्फे प्रशासनाला तातडीने पंचनामे व मदतीची मागणी
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पिकांवर पावसाने अक्षरशः पाणी फेरल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, बळीराजाच्या डोळ्यांत चिंता आणि नैराश्य दाटून आले आहे.
प्रामुख्याने कापूस, मका आणि सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे जमिनीवर पडलेले कापसाचे ओले झालेले कोष सडू लागले असून, मक्याचे कणीस व सोयाबीनची शेंग पिकण्याआधीच खराब झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हंगामभराच्या कष्टाला पाणी फिरले आहे.
या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र गट) तर्फे शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाकडे तात्काळ मदतीची मागणी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी सो., तहसीलदार सो. व तालुका कृषी अधिकारी सो., अमळनेर यांना निवेदन देण्यात आले असून, नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर मा. आमदार डॉ. बी. एस. पाटील, तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, शहराध्यक्ष प्रशांत निकम, तालुका युवक अध्यक्ष योगेश शिसोदे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, तसेच वासुदेव मामा, शांताराम कोळी, महेंद्र लोहार, कृष्णा पाटील, अनिल पाटील (जानवे), संजय मधुकर पवार, हरीश लाड (पातोंडा), चिंधू वानखेडे (अमळनेर), वासुदेव पाटील, वसंत पाटील (गांधली) यांसह अनेक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदतीचा निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंब करू,” असा इशारा त्यांनी दिला.



