तीन मित्रांची अविस्मरणीय कहाणी…! काळाने हिरावलेली साथ आणि हृदयात कोरलेल्या आठवणी…”
1 min read

तीन मित्रांची अविस्मरणीय कहाणी…! काळाने हिरावलेली साथ आणि हृदयात कोरलेल्या आठवणी…”

Loading

तीन मित्रांची अविस्मरणीय कहाणी…! काळाने हिरावलेली साथ आणि हृदयात कोरलेल्या आठवणी…”

सोनगिर  प्रतिनिधी —
मैत्री म्हणजे फक्त एकत्र असणं नाही, तर सुख-दुःखातही सावलीसारखी साथ देणं होय… अशीच एक अद्भुत, भावनिक आणि काळजाला भिडणारी कथा आहे विठ्ठल भिका माळी (माळी टेलर), सेवानिवृत्त एस.टी. कंडक्टर श्रीराम लोटन माळी आणि धुडकू नामदेव माळी या तिघा जिवलग मित्रांची…
ही त्रिमूर्ती गावात सर्वत्र ओळखली जायची — कुठेही गेलं तरी एकत्र, एकमेकांच्या आनंदात आणि दुःखात नेहमी सहभागी. लग्न, समारंभ, प्रवास, किंवा एखादा छोटा कार्यक्रम — हे तिन्ही मित्र एकमेकांशिवाय अपूर्ण वाटायचे. पण आज या दोघा मित्रांच्या आयुष्यात काळाने एक वेदनादायी पोकळी निर्माण केली आहे… कारण त्यांच्या त्रिकुटातील एक मित्र विठ्ठल भिका माळी यांना नियतीने हिरावून नेले आहे.

“चांगले माणूस देवाला लवकर आवडतात” असं म्हणतात, आणि तसंच काहीसं घडलं… तिरूपतीच्या दर्शनासाठी गेलेले विठ्ठल टेलर यांना तिथेच काळाने नेले. त्यांच्या जाण्याने मित्र श्रीराम लोटन माळी आणि धुडकू नामदेव माळी हे अक्षरशः पोरके झाले आहेत. अजूनही त्यांचा विश्वास बसत नाही की त्यांच्या सोबत नेहमी खांद्याला खांदा लावून उभा असलेला तो विठ्ठल आता नाही…
कै विठ्ठल भिका माळी यांच्या आयुष्यात दुःखाचे अनेक आघात आले होते — मुलगी आजारी पडून काळाच्या पडद्याआड गेली, नंतर पत्नीला कॅन्सर झाला. त्यांनी सर्व प्रयत्नांची परिसीमा गाठली, लाखो रुपये खर्च केले, पण नियतीसमोर हार पत्करावी लागली. तरीही त्यांनी कधीही धैर्य सोडले नाही… तीन मुलं आणि सुनांच्या प्रेमाने ते पुन्हा उभे राहिले.
मुलांपैकी एक पोलीस सेवेत, तर दोन शेतीकामात असून संपूर्ण परिवाराने आई-वडिलांच्या सेवेत आपले आयुष्य अर्पण केले.
कै विठ्ठल टेलर यांच्या शांत, मितभाषी आणि समजूतदार स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात घर करून गेले होते. त्यांचे बोलणे थोडे, पण विचार खोल… आणि आजही त्यांच्या आठवणींनी मन ओथंबून जातं.
श्रीराम माळी आणि धुडकू नामदेव माळी यांच्या डोळ्यात आता केवळ आठवणींची ओल आहे — तीन मित्रांची ती जोडी, आता दोन सावल्या घेऊन पुढे चालली आहे…
त्यांच्या आठवणींच्या सावलीत जगणं, आणि त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत पुढे जाणं — हाच त्यांच्या मुलांसाठी आणि मित्रांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल.
भावपूर्ण श्रद्धांजली
कै. विठ्ठल भिका माळी (माळी टेलर) यांना परमेश्वर चिरशांती देवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना…

💐💐💐💐💐

✍️ शब्दांकन : श्री. श्रीराम लोटन माळी
सेवानिवृत्त कंडक्टर, सोनगीर, जिल्हा धुळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *