दिवाळीपूर्वी शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वेतनात अडथळा येऊ नये — ‘शालार्थ’ प्रणालीतील नवीन प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याची मागणी , दिवाळीपूर्वी वेतन अदा करा, अन्यथा असंतोष वाढेल — डी.पी. महाले यांची शासनाला सूचना
![]()
दिवाळीपूर्वी शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वेतनात अडथळा येऊ नये — ‘शालार्थ’ प्रणालीतील नवीन प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याची मागणी
दिवाळीपूर्वी वेतन अदा करा, अन्यथा असंतोष वाढेल — डी.पी. महाले यांची शासनाला सूचना
अमळनेर प्रतिनिधी :
नाशिक पदवीधर मतदारसंघातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, दिवाळीपूर्वी सर्वांना वेळेवर पगार मिळावा यासाठी ‘शालार्थ’ प्रणालीतील नवीन पे-बिल प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याची मागणी पुढे आली आहे.
ही तातडीची विनंती मा. श्री. किशोरजी दराडे (आमदार, शिक्षक मतदारसंघ नाशिक) आणि मा. आ. सत्यजित दादा तांबे (आमदार, पदवीधर मतदारसंघ नाशिक) यांच्याकडे करण्यात आली आहे.
विनंतीचा मुख्य मुद्दा असा आहे की, सध्या शालेय शिक्षण विभागाने ‘शालार्थ’ प्रणालीमध्ये पे-बिल पुढे पाठवताना ती ‘संचमान्यता’ प्रणालीशी जोडलेली नवीन प्रक्रिया लागू केली आहे. या प्रक्रियेमुळे सिस्टीम आपोआप ‘संचमान्यता’ मधील मंजूर पदे आणि पे-बिलमधील कर्मचाऱ्यांची संख्या तपासत आहे. पदसंख्या जुळत नसल्यास, बिल पुढे न जाता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी थांबते. परिणामी, वेतन प्रक्रियेत विलंब होऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार मिळण्यात अडचण येऊ शकते.
त्यामुळे संघटनेने मांडलेले प्रमुख मागणीबिंदू असे:
1️⃣ नवीन प्रक्रिया स्थगित करावी — ‘संचमान्यता’ तपासणीची पे-बिल प्रक्रिया तातडीने थांबवावी.
2️⃣ दिवाळीपूर्वी वेतन देणे सुनिश्चित करावे — जुन्या प्रक्रियेनुसारच पे-बिल मंजूर करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन अदा करावे.
3️⃣ नवीन प्रक्रिया सणानंतर लागू करावी — प्रशासकीय तयारीसाठी वेळ देऊन दिवाळीनंतर ही प्रक्रिया लागू करावी.
शिक्षण विभागाच्या या तांत्रिक प्रक्रियेमुळे शिक्षक वर्गात नाराजीचे वातावरण असून, दिवाळीसारख्या प्रमुख सणापूर्वी पगारात विलंब होऊ नये, यासाठी संबंधित आमदारांनी पुढाकार घेऊन शासनाकडे तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटना महामंडळ, नाशिक विभागाचे विभागीय कार्यवाह श्री. डी. पी. महाले यांनी केली आहे.
“दिवाळीपूर्वी शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलू द्या, प्रणालीतील अडथळे नव्हे” — अशीच शिक्षक समाजाची अपेक्षा.

