आजची द्रौपदी — सबलीकरणाची प्रतीक! ‘द्रौपदी – काल, आज, उद्या’ कादंबरी प्रकाशन सोहळ्यात डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे विचार
![]()
आजची द्रौपदी — सबलीकरणाची प्रतीक!
‘द्रौपदी – काल, आज, उद्या’ कादंबरी प्रकाशन सोहळ्यात डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे विचार
अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन)
“द्रौपदी ही केवळ पौराणिक व्यक्तिरेखा नसून ती स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे — ती स्वयंभू, स्थितप्रज्ञ, बुद्धिमान, कुशल आणि सहनशील आहे. आजची द्रौपदी ही अन्यायातून न्यायाकडे, दुर्बलतेतून सबलतेकडे जाणारी आहे,” अशा भावपूर्ण शब्दांत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी स्त्रीशक्तीचा गौरव केला.
आडकर फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ लिखित ‘द्रौपदी – काल, आज, उद्या’ या कादंबरीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला वैशाली माशेलकर, रंगकर्मी संजीवनी समेळ, अभिनेते संग्राम समेळ, अमळनेर मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी आणि आडकर फाउंडेशनचे अध्यक्ष अँड. प्रमोद आडकर उपस्थित होते.
डॉ. माशेलकर म्हणाले,
> “अशोक समेळ यांच्या या साहित्यकृतीच्या मागे सखोल संशोधन आणि परिश्रम आहे. ही कादंबरी समाजाला नवा दृष्टिकोन देणारी आहे. आजची ‘द्रौपदी’ राष्ट्रपती भवनात निर्णय घेत आहे, रणांगणावर लढत आहे आणि अवकाशात एकटी राहूनही आत्मविश्वासाने झुंज देत आहे — हेच आधुनिक स्त्रीचे सशक्त रूप आहे.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले. उत्तरार्धात संजीवनी समेळ, श्रद्धा समेळ आणि संग्राम समेळ यांनी कादंबरीतील निवडक प्रसंगांचे भावनाप्रधान अभिवाचन केले. सभागृहात उपस्थित प्रेक्षकांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
फोटो कॅप्शन:
माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता — ‘द्रौपदी: काल, आज, उद्या’ या कादंबरीचे प्रकाशन करताना (डावीकडून) संग्राम समेळ, अॅड. प्रमोद आडकर, अशोक समेळ, डॉ. रघुनाथ माशेलकर, वैशाली माशेलकर, संजीवनी समेळ आणि डॉ. अविनाश जोशी.



