पालक–विद्यार्थ्यांच्या संयुक्त सहभागातून ‘नवदुर्गा संस्कार धारा’ स्तोत्र पठण स्पर्धा* नवरात्रीत पालक–विद्यार्थ्यांनी अनुभवला स्तोत्रांचा संस्कारमय गजर
![]()
*पालक–विद्यार्थ्यांच्या संयुक्त सहभागातून ‘नवदुर्गा संस्कार धारा’ स्तोत्र पठण स्पर्धा*
नवरात्रीत पालक–विद्यार्थ्यांनी अनुभवला स्तोत्रांचा संस्कारमय गजर
जळगाव : दि. ३०/०९/२०२५ ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त *‘नवदुर्गा संस्कार धारा स्तोत्र पठण स्पर्धा – पर्व एक’* चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे स्पर्धा केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित न राहता यामध्ये पालकांचा देखील सहभाग सुनिश्चित करण्यात आला होता. पालक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त सहभागामुळे कुटुंबातील सांस्कृतिक वातावरण वृद्धिंगत झाले तसेच शैक्षणिक–सांस्कृतिक उपक्रमांमध्ये पालकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे याचा आदर्श प्रस्तुत झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमान नरेंद्र पालवे तसेच पालक–शिक्षक संघाच्या सचिव सौ. प्रियंका आनंदा फेगडे यांची उपस्थिती लाभली.
स्पर्धेत सहभागी पालक–विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे श्री महालक्ष्मी स्तोत्र, श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र तसेच श्री सूक्त यांचे पठण सादर केले. स्तोत्र पठणामुळे एकाग्रता वृद्धिंगत होते, स्मरणशक्ती तीव्र होते, मनःशांती लाभते तसेच आत्मविश्वास दृढ होतो, अशा विविध अंगांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास हा उपक्रम उपयुक्त ठरल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
स्पर्धा दोन गटांमध्ये पार पडली. पाचवी ते सातवी गटात कु. काव्या व श्री. आनंद दिनकर फेगडे ह्यांनी प्रथम क्रमांक, कु. पुर्ती व श्रीमती चारुलता भारंबे ह्यांनी द्वितीय क्रमांक, तर चि. अजिंक्य व श्रीमती सविता रवींद्र विसपुते ह्यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
आठवी ते दहावी गटात चि. करण व श्रीमती स्वाती भूषण पाटील यांनी प्रथम क्रमांक, तर कु. रेवती व श्रीमती सीमा सुनील पांढरकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे व पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ शिक्षक श्री. वेदप्रकाश गडदे यांनी केले, तर समन्वयक व संचालक म्हणून श्री. महेंद्र मिरकुटे यांनी कार्यभार सांभाळला.
विशेष म्हणजे, इयत्ता नववी क मधील विद्यार्थीनी रेवती पांढरकर हिने कार्यक्रमाच्या शेवटी काठी फिरवण्याचा साहसी खेळ विद्यार्थ्यांसमोर सादर केला. या उपक्रमाद्वारे तिने विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचे कार्य केले आणि साहस – शौर्याची महत्त्वाची शिकवण दिली.
आयोजकांनी नमूद केले की, ही स्पर्धा पर्व – एक असून, आगामी पर्वांमध्ये देखील पालक–विद्यार्थ्यांच्या संयुक्त सहभागातून विविध स्तोत्रांचे पठण आणि संस्कार वृद्धिंगत करण्याचे उपक्रम चालू राहणार आहेत.

