सेवेतून संघर्ष, संघर्षातून यश – दादासाहेब शालिग्राम भिरुड सरांचा सेवानिवृत्ती प्रवास
![]()
सेवेतून संघर्ष, संघर्षातून यश – दादासाहेब शालिग्राम भिरुड सरांचा सेवानिवृत्ती प्रवास
अमळनेर प्रतिनिधी
३० सप्टेंबर २०२५ हा दिवस जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक विश्वासाठी खास ठरणार आहे. कारण या दिवशी शिक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, शैक्षणिक समस्यांचे चुटकीसरशी निराकरण करणारे, शिक्षकांचे खरे कैवारी म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब शालिग्राम ज्ञानदेव भिरुड सर आज सेवानिवृत्त होत आहेत.
एका सामान्य कुटुंबात जन्मलेलेदादासाहेब भिरुड सर यांचा प्रवास प्रेरणादायी ठरतो. मावशीकडे ओझर येथे झालेले प्राथमिक शिक्षण, नंतर खिरोदा येथे उच्च शिक्षण, आणि त्यानंतर थेट शिक्षण-शिक्षणच आयुष्यभर ध्येय बनले. सुरुवातीला जळगावच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत कलाशिक्षक म्हणून सेवा बजावताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य दिले. १९९३ पासून कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये उपशिक्षक म्हणून त्यांनी कार्य करत असताना हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडविले, अनेकांना एम्स, आयआयटी, एनआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांपर्यंत पोहोचविले.
शिक्षकांच्या समस्या म्हणजे सरांचे जीवनकार्य!
सीईटी परीक्षेतून वगळलेल्या शिक्षकांना पुन्हा कामावर घेणे, मान्यता आदेश मिळवून देणे, टप्पा अनुदान मंजूर करून घेणे, अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजनेविरुद्ध ठाम भूमिका घेणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करण्यासाठी लढा देणे – ही सरांची संघर्षगाथा आहे. आंदोलन असो, निवेदन असो, अथवा मंत्रालयापर्यंत धाव – शिक्षकांचे प्रश्न सुटल्याशिवाय भिरुड सर शांत बसले नाहीत.
फक्त शैक्षणिकच नव्हे तर सहकार क्षेत्रातही त्यांनी आदर्श निर्माण केला. जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांच्या नागरी सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदावर काम करताना ३६३ कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या संस्थेला त्यांनी नावलौकिक मिळवून दिला. त्यांच्या कार्यामुळे शिक्षक पतपेढी आज विश्वासार्हता आणि प्रगतीचे प्रतीक ठरली आहे.
आज त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिले की जाणवते –
👉 प्रश्न कितीही जटिल असो, त्याचे उत्तर भिरुड सरांकडे नक्कीच मिळते.
👉 ओळखीचे असो वा अनोळखी, शिक्षकाला न्याय मिळवून देणे हेच सरांचे ध्येय राहिले.
👉 संघर्षातून उभे राहून शिक्षक चळवळीस दिशा देणारे ते खरे शिक्षक नेते ठरले.
कौटुंबिक पार्श्वभूमीही साधी, पण आई सुशीला ताईंचे संस्कार आणि पत्नी सौ. वंदनाताईंच्या खंबीर साथीतून भिरुड सरांनी संपूर्ण खानदेशासह राज्यभरात वेगळी छाप पाडली.
आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने एकच भावना उमटते –
🌸 “भिरुड सर म्हणजे शिक्षकांचा विश्वास, शिक्षकांचा आधार, शिक्षकांचा कैवारी!” 🌸
सरांच्या भावी वाटचालीस गजानन महाराज चांगले आरोग्य व दीर्घायुष्य देवोत हीच सदिच्छा!
आपला –
ईश्वर आर. महाजन
उपशिक्षक, महात्मा ज्योतीराव फुले हायस्कूल, देवगाव
मुख्य संपादक, मराठी लाईव्ह न्युज
विभागीय प्रसिध्दीप्रमुख, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य
तालुका प्रतिनिधी, दैनिक महाराष्ट्र सारथी
9860352960

