जिवंतपणी आखलेली इच्छा; मृत्यूनंतर पूर्णत्वास – बापूंच्या पैशातून गौरेश्वराला 31 फूट त्रिशूल दान
![]()
जिवंतपणी आखलेली इच्छा; मृत्यूनंतर पूर्णत्वास – बापूंच्या पैशातून गौरेश्वराला 31 फूट त्रिशूल दान
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
– शहापूर गावातील महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ, गौरेश्वर महादेव मंदिर शहापूर येथे कै. पिरन भोमा पाटील यांनी 31 फूटांचा भव्य त्रिशूल दान करून स्वतःला व महादेवाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दिली.
बापूंच्या मागे-पुढे कोणीच नव्हते. तरीदेखील त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी गावातील काही मंडळींना सांगून ठेवले होते – “माझ्या मृत्यूनंतर उरलेले पैसे गौरेश्वर महादेवाला त्रिशूल दान करण्यासाठी वापरावेत.” त्यांच्या जवळ असलेली एकूण रक्कम तीन लाख रुपये होती. त्यातील दीड लाख रुपये उत्तरकार्याला वापरले गेले, तर उरलेले दीड लाख रुपये मंदिरासाठी 31 फूटांचा त्रिशूल दान करण्यासाठी खर्च करण्यात आले.
कै. पिरन पाटील हे आध्यात्मिक आणि धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्त्व होते. गावातील कीर्तन सप्ताहात त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. समाजातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग नेहमीच उत्साहवर्धक राहिला. त्यांना मूलबाळ नसल्यामुळे, त्यांनी जिवंतपणीच आपली सर्व इच्छा व मार्गदर्शन ग्रामस्थ मंडळांना स्पष्टपणे सांगून ठेवले होते.
ग्रामस्थांनी त्यांच्या इच्छेला मान देत, वाजतगाजत अंत्ययात्रा काढली, उत्तरकार्य पार पाडले आणि उरलेले पैसे मंदिरासाठी वापरून भव्य त्रिशूल दान करून बापूंच्या इच्छेला न्याय दिला. या कृतीमुळे गावकऱ्यांनी त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली.
युवा उद्योजक योगेश पाटील तथा
ग्रामस्थ मंडळांच्या मते, कै. पाटील यांनी केलेले हे प्रेरणादायी कार्य संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांच्या मनात कायमस्वरूपी तेजोमय राहील. या त्रिशूल दानामुळे केवळ धार्मिक स्थळाची शोभा वाढली नाही असे सांगितले.
तर समाजात श्रद्धा, सद्भावना आणि प्रेरणेचा अनमोल संदेश पोहोचला आहे.
गावातील नागरिकांनी कै. पिरन भोमा पाटील यांच्या या उदार कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले असून, त्यांच्या कर्तुत्वाला व श्रद्धाभावाला सलाम ठोकला आहे.

