कृषीप्रधान देशात शेतकऱ्याची दैना!*
1 min read

कृषीप्रधान देशात शेतकऱ्याची दैना!*

Loading

*कृषीप्रधान देशात शेतकऱ्याची दैना!*

भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या देशाचा सर्वात जास्त शेती योग्य भूभाग आपल्या देशाला लाभला असल्याने भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्याच्यावरचं देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे.
त्यामुळे शेती हा व्यवसाय देशाचा मुख्य कणा आहे. जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे.
शेतकरी हा देशातील महत्वपूर्ण घटक मानला जातो.
शेतकरी शेतात राब राब राबून उत्पन्न पिकवतो, त्याने पिकविलेल्या शेत मालावर संपूर्ण विश्वातील माणसे जगत आहेत. शेतकऱ्यांच्या जीवावरच हा देश टिकून आहे.
यावर्षी मे महिन्यापासूनच अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे . जून ,जुलै, ऑगस्ट महिन्यात काही भागात अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने खरीप पिके मातीमोल झाले असून आसमानी संकटाने शेतकऱ्यांचे चक्क कंबरडे मोडले आहे. सांगा आम्ही जगायचे कसे? अशी आर्त हाक शेतकऱ्यांतून ऐकायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात अतिृष्टीचा पावसामुळे कडधान्य ,ज्वारी, मका व कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही भागात सोयाबीन ,केळी अन्य पिकांचे नुकसान झाले आहे.शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून शासनाकडून भरपाई मिळेल या आशेने तो जगत आहे.
एकंदरीत राज्यात ओला दुष्काळ पडला आहे.अशावेळी बळीराजाला कोणीही वाली नाही.राजकारणी लोक मात्र डोळेझाक करतात. अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई मिळते पण तीही तुटपुंजी मिळते.अशा संकटांचा सामना शेतकरी राजा करतो. केवळ शासकीय दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस शेतकरी गरीब, दुर्बल व कर्जबाजारी होऊन प्रसंगी आत्महत्या करण्यास मोठ्या प्रमाणात प्रवृत्त होतांना दिसत आहे.
यावर्षी पावसाच्या पाण्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. घरात ,शेतात सगळीकडे पावसाचं थैमान असून मुसळधार पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकांचा अक्षरशः ओला चिखल झाला आहे.
सरकारला ही बळीराजाची व्यथा दिसत नाहीये , सरकार बळीराजाला मदत कधी करणार ,
ओला दुष्काळ कधी जाहीर होणार हा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. शासनाने तात्काळ पिक विमा लागू करावा हेक्‍टरी ५० हजार अनुदान द्यावे अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याशिवाय राहणार नाही.
एकीकडे सरकारला लाडकी बहिण योजनेसाठी कर्ज काढून बहिणींना काहीच अपुरे पडू देत नाहीये. मात्र शेतक-याला वा-यावर सोडले असून सरकारला शेतकऱ्यांविषयी तळमळ नाही असे चित्र आपल्याला सर्वत्र दिसून येत आहे.

*-अजय भामरे*
कार्य.संपादक: साप्ताहिक लेखन मंच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *