कला हीच समाजमन घडविण्याची खरी ताकद,  शारदीय व्याख्यान मालिकेत सिने अभिनेता, लेखक व दिग्दर्शक योगेश सोमण यांचे प्रतिपादन
1 min read

कला हीच समाजमन घडविण्याची खरी ताकद, शारदीय व्याख्यान मालिकेत सिने अभिनेता, लेखक व दिग्दर्शक योगेश सोमण यांचे प्रतिपादन

Loading

कला हीच समाजमन घडविण्याची खरी ताकद

शारदीय व्याख्यान मालिकेत सिने अभिनेता, लेखक व दिग्दर्शक योगेश सोमण यांचे प्रतिपादन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर व प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प आज दि. २६ सप्टेंबर रोजी मराठा मंगल कार्यालयात गुंफण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमापूजन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून सिने अभिनेता, लेखक व दिग्दर्शक योगेश सोमण (मुंबई) उपस्थित होते तर प्रमुख अतिथी खासदार स्मिताताई वाघ, मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, डॉ. संदीप जोशी (हृदयरोग तज्ज्ञ), डॉ. मयुरी जोशी, कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरच्या संचालक सौ. सुषमाताई वासुदेव देसले, मंडळाचे सदस्य सौ. वसुंधरा लांडगे, प्रा. शिला पाटील, स्नेहा एकतारे, भैय्यासाहेब मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

 

शारदीय व्याख्यानमालेस व्यापक प्रसिद्धी दिल्याबद्दल पत्रकारांचा विशेष सत्कारही करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना खासदार स्मिताताई वाघ म्हणाल्या की, व्याख्यानमाला सतत चालू ठेवणे हे कठीण असते पण मराठी वाङ्मय मंडळाने हे कार्य सातत्याने पुढे नेले असून यामुळे विचारांची मेजवानी लाभते. कलाकार कलेत जिवंतपणा आणतो तर राजकारणी समाजकारणात संतुलन राखतो असे त्या म्हणाल्या.

 

मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी व्याख्यानमालेच्या यशस्वीतेचे श्रेय पदाधिकारी, देणगीदार व रसिकवर्गाला दिले. अमळनेरचे वैभव जोपासण्याची जबाबदारी आपली असून मंडळाला दोनदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद लाभले ही मोठी अभिमानाची बाब आहे. पुढील वर्षी मंडळाच्या ७५ व्या वर्षानिमित्त हा कार्यक्रम भव्य करण्याचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख वक्ते योगेश सोमण यांनी ‘कलाक्षेत्राचा समाजमनावर होणारा प्रभाव’ या विषयावर विचार मांडताना सांगितले की भारतीय समाजाने कलाकृतीला नेहमी करमणुकीपुरते मर्यादित ठेवले, संत तुकारामांच्या काळात समाजमनावर जसा प्रभाव झाला तसा आज दिसून येत नाही. शिवाजी महाराज, संभाजी राजे, संत तुकाराम यांच्याकडून प्रेरणा घेण्याऐवजी ते दुसरीकडे जन्माला यावेत अशी मानसिकता दिसते. डिजिटल माध्यमामुळे कलेचे सादरीकरण बदलले आहे, नक्कल करणे सोपे आहे पण ती खरी कला नाही. शिक्षक-पालक नात्यावर भाष्य करताना त्यांनी पूर्वी पालक शिक्षकांच्या शिक्षेला पाठिंबा देत असत मात्र आता शाळेत जाऊन प्रश्न विचारतात असे नमूद केले. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, नाटककार अशा विविध भूमिकांतून आलेला अनुभव सांगतांना त्यांनी ‘लेखन हे शाश्वत आहे – त्याला मरण नाही’ असे प्रतिपादन केले. दिग्दर्शक व प्रशिक्षक यातला फरक स्पष्ट करत त्यांनी चांगला प्रेक्षक घडवणे हेच शाश्वत कार्य असल्याचे अधोरेखित केले.
योगेश सोमण यांचा अनुभवसंपन्न व्याख्यान संदेश: कला, जीवन आणि कुटुंबातील संवाद यावर बोलतांना सांगितले
त्यांनी त्यांच्या जीवनातील सुखद आणि दुःखद अनुभव खुल्या मनाने सर्व रसिक वर्गासमोर मांडले. त्यांनी स्पष्ट केले की, अभिनय हे खोटे असते, पण त्यामागील अनुभव आणि कलेची खरी ताकद खरे असते. त्यांच्या कथनशैलीमुळे उपस्थित रसिक वर्ग शेवटपर्यंत गुंग राहिला आणि संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांत व ध्यानपूर्वक ऐकला गेला.
योगेश सोमण यांनी आपल्या अनुभवातून कलाक्षेत्राचा समाजमनावर होणारा प्रभाव, डिजिटल माध्यमांचा बदल, नक्कल आणि खरी कला यातील फरक, तसेच लेखक, दिग्दर्शक आणि प्रशिक्षक या विविध भूमिकांमधून मिळालेले जीवनमूल्य याबाबत सविस्तर विवेचन केले. त्यांनी नमूद केले की, पूर्वी पालक शिक्षकांच्या शिक्षेला पाठिंबा देत असत, पण आता शाळेत जाऊन मुलांच्या शिक्षेबाबत प्रश्न विचारणारे पालक झाले आहेत..
व्यक्तिगत जीवनाबाबत त्यांनी सांगितले की, कुटुंबातील संवाद कायम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. “घरात एकमेकांशी बोला; भ्रमध्वनीमुळे बोलणे कमी झाले आहे आणि वाचनसंस्कृती कमी झाली आहे. याचे आत्मपरीक्षण प्रत्येकाने करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत सांगितले. त्यांच्या व्याख्यानातून जीवनातील सकारात्मक बदल, कलाक्षेत्राचा सामाजिक परिणाम आणि घरातील संवाद वाढवण्याचे महत्त्व यांचा संदेश स्पष्ट झाला. योगेश सोमण यांनी उपस्थित रसिक वर्गाला प्रेरित केले की, जीवनातील अनुभव, कला आणि कुटुंबातील नाते यांचा सुसंगत संतुलन राखल्यास तर समाज आणि व्यक्ती दोन्ही प्रगल्भ होतील असे सांगितले.
व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, कवी रमेशजी पवार,कार्यवाह नरेंद्र निकुंभ, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश महेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्वीकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे, जगदीश कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मंडळाचे पदाधिकारी संदीपजी घोरपडे, नरेंद्रजी निकुंभ सर यांनी केले.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *