धनगर समाजाकडून तहसीलदारांना निवेदन : जालना येथील दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा
![]()
धनगर समाजाकडून तहसीलदारांना निवेदन : जालना येथील दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा
अमळनेर प्रतिनिधी
सकल धनगर समाज व राजे मल्हार होळकर प्रतिष्ठान तर्फे एस.टी. आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आज धनगर समाज बांधवांनी मा. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन दिले.
या निवेदनात सांगितले आहे की, एस.टी. आरक्षणाच्या मुद्यावर शासनाने आजवर शेकडो बैठकाही घेतल्या, अनेक आंदोलनेही झाली. बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत दिलेला शब्द आजवर पाळलेला नाही. त्यामुळे आमचे बांधव दीपक बोराडे हे दि. १७ सप्टेंबर २०२५ पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, जालना येथे उपोषणास बसले असून आज त्यांच्या या आंदोलनाचा सहावा दिवस आहे.
उपोषण असूनही शासनाने याकडे दखल घेतलेली नाही. त्यामुळे पुढील दोन दिवसांत धनगर जमातीच्या घटनादत्त एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि उपोषणकर्त्याला न्याय द्यावा, अन्यथा दीपक बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर धनगर समाजाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर बन्सीलाल भागवत, एस.सी. तेले सर, प्रदीप कंखरे, रमेशदेव शिरसाठ, आनंदा हडप सर, ए.बी. धनगर सर, दिलीप खांडेकर, तुषार इदे, संजय धनगर मांडळ, रमेश धनगर, दशरथ युवराज लांडगे, विजय हिवराळे, सचिन शिरसाठ, दत्तात्रय धनगर, नामदेव ठाकरे, तुकाराम ठाकरे, परशुराम ठाकरे (धानोरा) आदींच्या सह्या आहेत.

