अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेत बहारदार काव्यसंध्या : सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे व अरुण म्हात्रे यांच्या सुरेल कवितांची मैफल रसिक मंत्रमुग्ध…!!
![]()
अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेत बहारदार काव्यसंध्या : सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे व अरुण म्हात्रे यांच्या सुरेल कवितांची मैफल रसिक मंत्रमुग्ध…!!
अमळनेर प्रतिनिधी
मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर, प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान आयोजित शारदीय व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी मराठा मंगल कार्यालयात रसिकांसाठी अविस्मरणीय काव्यसंध्या रंगली. सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे (ठाणे) व कवी अरुण म्हात्रे (ठाणे) यांच्या “सुमधुर मराठी कवितांचा सुंदर कार्यक्रम” या विशेष काव्यसंध्येत रसिकांना सुरेल कवितांचा अद्भुत अनुभव मिळाला.
या काव्यसंध्येला मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, जनार्धन म्हात्रे, मंडळाचे पदाधिकारी कवी रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ हे व्यासपीठावर उपस्थित होते. अतिथी म्हणून मिलिंद कुडे, अक्षय प्रा. डॉ एस.ओ. माळी, जितेंद्र भागवत उपस्थित होते. प्रा. डॉ. महेश्वरी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
अतिथींचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, कार्यवाह नरेंद्र निकुंभ व कवी रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला. देणगीदारांचा तसेच चित्रकार केशव कासार व गझलकार म्हात्रे यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी प्रमुख अतिथी मिलिंद कुडे यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करून आभार मानले.
अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी कवितांचा सोहळा रंगला. सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे व अरुण म्हात्रे यांच्या सुरेल सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले व मराठी कवितेची जादू अविस्मरणीय ठरली.
काव्यसंध्येला रसिकांसमोर आपल्या खास शैलीत मनोगत व्यक्त करताना कवी अशोक बागवे म्हणाले – “रसिकांशिवाय कवीचा अर्थच नाही. कवी जेव्हा प्राणातून बोलतो, तेव्हा त्याला फक्त हसवायचे नसते, तर अंतर्मनाला भिडणारा अनुभव द्यायचा असतो.” त्यांच्या या शब्दांना सभागृहातून टाळ्यांचा गजर झाला.
यानंतर त्यांनी सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या ओजस्वी कविता सादर करून वातावरण भारावून टाकले. “मी रसिकांसाठी लिहतो, तेच माझ्यासाठी देव आहेत,” असे म्हणत त्यांनी मंगेश पाडगावकर यांच्या कवितांची सरिता रसिकांसमोर उलगडली. “आई एक गाव असते” ही हृदयस्पर्शी कविता त्यांनी सादर करताच श्रोत्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले.
बहीणाबाई चौधरींच्या जीवनानुभवातून उमटलेल्या ओव्या, शांताबाई शेळके यांची भावपूर्ण रचना, विठ्ठल वाघ यांच्या जोशपूर्ण कविता, वि. दा. करंदीकरांचे चिंतनशील शब्द, वसंत बापट यांच्या भावकविता, नारायण सुर्वे यांच्या सामाजिक भान जागवणाऱ्या रचना तसेच नायगावकर यांच्या सहजसुंदर पंक्ती अशोक बागवे यांनी अप्रतिमरीत्या सादर केल्या. “पाऊस पडतो तेव्हा…” या कवितेच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले आणि टाळ्यांचा कडकडाट उसळला.
कवी अरुण म्हात्रे यांनीही आपल्या खास ठसक्याच्या शैलीत जीवन, नातेसंबंध आणि माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या कवितांचे सादरीकरण केले. त्यांच्या कवितांमधील लयबद्धता, सामाजिक भान व भावनिकता यामुळे रसिकांचा काव्यरस अगदी परिपूर्ण झाला.
या व्याख्यानमालेचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश महेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्वीकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे, जगदीश कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सौ. वसुंधराताई दशरथ लांडगे व प्रा. डॉ. सुरेश महेश्वरी यांनी केले. रसिकांच्या मोठ्या उपस्थितीने आणि काव्यगायनाच्या जादूने अमळनेरची ही काव्यसंध्या संस्मरणीय ठरली.



