पावसातही उत्साहाची लाट – २२२ तरुणांनी केले रक्तदान, अमळनेरमध्ये इतिहास घडला*
![]()
*पावसातही उत्साहाची लाट – २२२ तरुणांनी केले रक्तदान, अमळनेरमध्ये इतिहास घडला*
अमळनेर, दि. ५ (प्रतिनिधी) –
जश्ने ईद-ए-मिलादूनबीच्या 1500 वर्षाच्या पवित्र जन्मदिनाच्या निमित्ताने अमळनेर शहरात मुस्लिम समाजातील तरुणांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे करण्यात आले. *या शिबिरात तब्बल २२२ तरुणांनी रक्तदान करीत विक्रमी इतिहास रचला.*
शिबिराचे उद्घाटन पोलीस उपविभागीय अधिकारी कोते साहेब व पोलीस निरीक्षक निकम साहेब यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. दिवसभर पावसाची संततधार सुरू असताना देखील तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत लांबच लांब रांगेत उभे राहून रक्तदान केले.
मान्यवर म्हणून उलमा-ए-केराम, मुबल्लिगीन हजरात, माजी नगरसेवक, डॉक्टर, एडवोकेट, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, ईदगाह कब्रस्तान कमिटी, मस्जिद-मदरसा ट्रस्टी, नवजवान फ्रेंड सर्कल आदींची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
*रक्तदान: थेंबातुन जीवन निर्माण करणारा देवत्वाचा प्रवास..*
“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, जात-पात-धर्म वा पद न पाहता फक्त माणुसकी म्हणून समाजोपयोगी उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे,” असे आवाहन यावेळी पोलिस निरीक्षक निकम साहेब यांनी केले.
मुस्लिम समाजातील तरुणांचा हा सक्रिय व उत्साही युवा ग्रुप असून, कोणताही धार्मिक किंवा जातीय भेदभाव न करता लोकसेवेसाठी सदैव तत्पर राहतो. रक्तदानामुळे असंख्यांचे प्राण वाचतात. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी प्रत्येकाने रक्तदानाचा संकल्प करावा, असे आवाहन आयोजकांनी केले.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे विविध समाजघटकांनी एकत्र येऊन मानवतेच्या सेवेसाठी सहभाग नोंदवला. मान्यवरांचे शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
शिबिर यशस्वीतेसाठी मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तसंकलन जीवन श्री ब्लड बँक तर्फे करण्यात आले. यावेळी ब्लड बँकच्यावतीने सर्व रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.
या भव्य रक्तदान शिबिरामुळे अमळनेर शहरात “रक्तदान सर्वश्रेष्ठ दान” हा संदेश दृढ होत, समाजसेवेच्या इतिहासात सुवर्णपानाची भर पडली.


