डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याचे आवाहन*
1 min read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याचे आवाहन*

Loading

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याचे आवाहन*

जळगाव, दि. २५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास साधण्यासाठी, जनतेला दर्जेदार ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” आणि भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” प्रदान करण्यात येतात.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून अ, ब, क आणि ड वर्गात अनुक्रमे एक लाख, पंच्याहत्तर हजार, पन्नास हजार व पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, राज्यस्तरावर एका उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि एका उत्कृष्ट ग्रंथालय सेवकाला प्रत्येकी पन्नास हजार रुपये, तर प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एका कार्यकर्ता आणि एका सेवकाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट प्रदान करण्यात येईल.

सन २०२४-२५ या वर्षासाठी या पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक ग्रंथालये, ग्रंथालय कार्यकर्ते व सेवकांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतीत आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

या पुरस्कारामुळे राज्यातील वाचन संस्कृतीचा प्रसार होत असून ग्रंथालयीन सेवांच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ होत असल्याचे गाडेकर यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *