सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या अवतार कार्याला ८०० वर्ष पूर्ण झाली. श्रीचक्रधर स्वामींनी समाजाला सत्य,अहिंसा, मानवता,समानता ही मूल्ये दिली.-मुख्याध्यापक जगदिश पाटील
![]()
सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी
महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या अवतार कार्याला ८०० वर्ष पूर्ण झाली.
श्रीचक्रधर स्वामींनी समाजाला सत्य,अहिंसा, मानवता,समानता ही मूल्ये दिली.: मुख्याध्यापक जगदिश पाटील
संकलन: मनिलाल शिंपी
१२ व्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी गुजरात मधील भरूच नगरीचे प्रधान विशाल देव व माता माल्हनीदेवी यांच्या घरी अवतार घेतला. पंचविसाव्या वयापर्यंत समर्थपणे राज्यकारभार केल्यानंतर रामटेक यात्रेनिमित्त महाराष्ट्रात आले. संपूर्ण महाराष्ट्र श्री क्षेत्र पैठणला अनेक विद्वान, संत,समाजमान्य,
सर्वसामान्य मंडळी स्वामींची भक्त झाले.
पैठण,रामटेक, सालबर्डी, भंडारा, डाकराम,रिद्धपूर,राहेर, नांदेड,वेरूळ,सिन्नर,बीड
कनाशी,जालना, पंचाळेश्वर, खडकुली, डोमेग्राम, नेवासा श्रीरामपूर, बेलापूर इत्यादी ठिकाणचा परिभ्रमण काळात महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माचे लोक स्वामीजवळ आले.
स्वामींनी भक्तांना अध्यात्माची शिकवण देत असताना समाजात वागताना जगण्याची जीवनमूल्य सांगितली सत्य बोलावे, प्राणिमात्रांवर दया करावी,कोणाचीही अंत:करण दुखवू नये,भीती दाखवू नये, अभद्र बोलू नय, अपमान करू नये यासह समाजातील अंधश्रद्धा, उच्च- नीचता, विटाळ वर्णा, स्पृश्यास्पृश्यता, स्त्रियांना असमान वागणुक अशा अनेक अनिष्ट प्रथा बंद केल्या. प्राणिमात्रांवर दया करणे माणसाने माणसाशी माणूस म्हणून वा हा जागतिक संदेश श्रीचक्रधर स्वामींनी दिला.
श्री चक्रधर स्वामींच्या स्मरणभक्तीतून ग्रंथराज लीळाचरित्र तयार झाला. या ग्रंथातून महानुभावांनी ६५०० ग्रंथ निर्माण केले. पुढे विपुल साहित्य निर्माण झाले. येथूनच मराठी साहित्य परंपरेची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक जडणघडीत अनेकांनी योगदान दिले पण समाज सुधारण्याची सुरुवात करणारे मराठीला धर्म भाषेचा मान देणारे आणि मानवतेच्या संदेश देणारे महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींचे अमूल्य योगदान आहे.


पंचकृष्ण निरूपण करीत असताना श्रीचक्रधर स्वामी माहीमभट्टाला प्रथम श्री गोपाळ कृष्ण हे अवतार निरूपण करतात. त्यानंतर क्रमाने श्री दत्तात्रेय प्रभू,
श्री चक्रपाणी प्रभू, नंतर श्री गोविंद प्रभू आणि पाचवे ईश्वर अवतार आम्ही स्वतः श्रीचक्रधर आहोत हे सांगतात. जीवाला स्वतः ज्ञान होत नाही,ईश्वराला ओळख करून द्यावी लागते त्याच वेळेस जीवाला परमेश्वराची ओळख होते. अशा पद्धतीने सर्वज्ञांनी माहीमभट्टाना अनुलक्षून संपूर्ण मानव जातीला पंचअवताराची ओळख करून दिली.
मूल्यधिष्ठीत समाज संवर्धन करणारा महानुभाव पंथ:-व्यसनं समाजाला विकलांग करणारी कीड आहे. सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंनी ईश्वरमार्गीचा अनुयायी हा व्यसनमुक्त असला पाहिजे तरच तो सात्विक धर्माचरण करू शकेल, हा दंडक घालून दिला. आजही महानुभाव पंथात अनुग्रह देण्यापूर्वी सदरहू व्यक्तीकडून सप्त व्यसनांचा त्यागाच्या संकल्प केला जातो.
द्युतंच मद्यंचं पिशितंच वेश्या,
पापर्ध चौर्य परव्दार सेवा
एतानी सप्त व्यसनानी,
घोरात गोरे नरके पचन्ती
अशा सप्त व्यसनांच्या त्या करावा ही महानुभाव पंथांची मूळ भूमिका आहे अनेक व्यसनांच्या अधीन झालेल्या दरोडेखोर नागदेवाला सर्वज्ञांच्या सुवर्ण स्पर्श लाभला. त्याची अविचारी हिंसक वृत्ती पालटून त्यातून सात्विक संस्कारशील आचार्य श्री नागदेव आकाराला आले. सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंच्या मूल्य संवर्धनाचा हा वसा महानुभाव पंथाने प्राचीन मध्ययुगीन आणि अर्वाचीन काळातही सक्षम पद्धतीने चालविला.आचार,विचार आणि उच्चार या तिन्ही अंगांनी संस्कारक्षम साधक घडविण्याचा निरंतर प्रयास या पंथाद्वारे होत आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आजपर्यंत हजारो महानुभाव पंथीय संस्कारक्षम साधकांनी मूल्यधिष्ठीत समाज संवर्धनासाठी मोठा वाटा उचलला. त्याच्या पाऊलखुणा इतिहासाच्या पानापानातून आढळतात. महानुभाव संप्रदायाने ब्रह्म मुहूर्तावरील पहाटे तीन ते सकाळी सहा या प्रथम प्रहरामध्ये ईश्वरीय स्मरण साधना ही सर्वांसाठी अनिवार्य केली.आपोआप रात्री लवकर झोपणे आणि पहाटे लवकर उठणे अशी दिनचर्या त्यामुळे नियोजित झाली. मनाने अशांत असलेल्या माणसानं ब्रह्म मुहूर्तावर उठून जर ध्यान साधना केली तर त्याला निश्चितच मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं असं आरोग्य शास्त्र सांगतं. शरीराच्या सुदृढतेसाठी सुयोग्य सात्विक आहार प्रणाली पंथाने विहित केली. विविध अध्यात्मिक विधींमध्ये सर्वांच्या कृतिशील सहभाग आवश्यक केला.दैनंदिन कामकाजात अनाहूतपणे पापरूप कर्म घडले तर शुद्धीकरणासाठी स्वतंत्र प्रायश्चित्त विधीचे नियोजन केले. तसेच दिवसातून किमान तीन वेळा पूजा अर्चा झाल्यानंतर साष्टांग दंडवताच्या विधी सर्वांना अनिवार्य केला त्यामुळे दिवसभरातून किमान २५ ते ५० दंडवत घातले जातात आपोआपच सर्वांगासनाचा व्यायाम होतो.
महानुभाव पंथान नागरिकांच्या चारित्र्यसंपन्न संस्कारावर मोठे कार्य केले स्वातंत्र्य समता आणि विश्वबंधुता या लोकशाहीतील मूलभूत मूल्यांच्या स्वीकार करून जीवन जगण्याचा संकल्प पंथीयांच्या आहे. न्याय मार्गाने सामाजिक जाणिवा जोपासत आत्मोध्दारातून समाजोध्दार घडविण्यासाठी हा महानुभाव पंथ सदैव कटिबद्ध आहे.
या संप्रदायाच्या अनुयायी स्वतःचा उदरनिर्वाहाचं कार्य करताना इतरांवर अन्याय करत नाही आणि विनाकारण कुणाच्या अन्याय सहनही करीत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी देश विघातक कृत्याला कधीही पाठबळ देत नाही. राष्ट्रीय संपत्तीच्या विनाश करणाऱ्या हिंसक दंगलीत कधीही सहभागी होत नाही. माझा देश हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून सत्य, अहिंसा,शांती,समता साधेल.राष्ट्रीय ऐक्यतेची पताका खांद्यावर घेऊन काश्मीर ते कन्याकुमारी अन मुंबई ते कोलकाता या चहुदिशांनी अखंड परिभ्रमण करतो.देव,देश आणि धर्म या तिन्ही विचार विचारधारांसाठी स्वतःची बांधीलकी जोपासतो. परस्परांमध्ये परमप्रीतीचे वर्तन करीत समाजाच्या,पर्यायाने राष्ट्रीय ऐकण्यासाठी हा मानभाव पंथ प्रयत्नरत असतो महानुभाव संप्रदायाची असे हे मोलाचं योगदान कालही होते, आज आहे आणि उद्याही नक्कीच राहील.
संकलन: डॉ.मनिलाल शिंपी
लेखक:-श्री जगदीश सुदाम पाटील
(मुख्याध्यापक
गुरुवर्य गोविंद श्रीपत पाटील माध्यमिक विद्यालय परिवर्धा, शहादा, जि.नंदुरबार.)

