उक्ती आणि कृती याचा सुरेख संगम म्हणजे अहिल्याबाई होळकर., मराठी लाईव्ह न्युज चे विशेष प्रतिनिधी सोपान भवरे सर यांनी टाकलेला प्रकाश
1 min read

उक्ती आणि कृती याचा सुरेख संगम म्हणजे अहिल्याबाई होळकर., मराठी लाईव्ह न्युज चे विशेष प्रतिनिधी सोपान भवरे सर यांनी टाकलेला प्रकाश

Loading

 

उक्ती आणि कृती याचा सुरेख संगम म्हणजे अहिल्याबाई होळकर.

‌ भारतामध्ये अनेक स्त्रियांनी राज्यकारभार करून आपली अमीट अशी छाप उमटवून ठेवलेली आहे. राजे छत्रपती शिवबाच्या मातोश्री जिजाऊ यांनी स्वतः युद्धाला सामोरे जाऊन कर्तबगार वीरांगणा म्हणून नाव कमविले. शिवाजी महाराजांच्या सून ताराबाई शिंदे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने तसेच शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाने राज्यामध्ये समता निर्माण केली. त्याच आदराने थोर सम्राज्ञी अहिल्याबाई होळकर यांचा उल्लेख इतिहासात केला जातो. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी राणीचा जन्म झाला. अहमदनगर जिल्ह्याला राणीचे नाव दिले गेले आहे. अहिल्याबाई यांचे वडील माणकोजी शिंदे हे गावातील पाटीलकी असलेले धनगर जातीचे गृहस्थ होते. गावामध्ये त्यांचा नैतिक दबदबा होता. गावातील न्याय निवाडा ते करीत असत. पेशवेशाहीला शेतसारा जमा करण्यास मदत करीत असत. गावामध्ये लोकांना आर्थिक सहकार्य करीत असत. त्यांचा शेळ्या – मेंढ्या पाळण्याचा अर्थात पशुपालनाचा व्यवसाय होता. गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे काम ते करीत असत.अहिल्याबाईंच्या आईचे नाव सुशिलाबाई होते. आई चाणाक्ष व कर्तबगार महिला होती. अहिल्याबाईवर चांगले संस्कार करण्याचे काम सुशिलाबाईंनी केले. त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथाच्या गोष्टी अहिल्याला सांगितल्या. मालकोजी आपल्या मुलीला न्याय निवाडा करण्यासाठी सोबत घेऊन जात. अहिल्याबाई लहानपणापासून धीट होत्या. प्रत्येकाशी विनम्रतेने बोलण्याची त्यांचे कसब होते. त्या काळात शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध नव्हते. एकदा पहिले बाजीराव पेशवे व मल्हारराव होळकर पुण्याला जात असताना चौंडी तालुका जामखेड या मार्गाने निघाले होते. वाटेवर चौंडी गाव लागले. त्यांना रस्त्यात पाण्याची तहान व भूक लागली होती. ते एका मंदिराजवळ थांबले. त्या ठिकाणी बालिका अहिल्या व तिच्या मैत्रिणी होत्या. अहिल्याबाईंना शेळ्या मेंढ्या सांभाळायची आवड होती. त्यामुळे त्या जंगलात जाताना जेवणाची भाकरी सोबत घेऊन जात. अहिल्याबाईला मल्हारराव यांनी पाण्याची मागणी केली. त्यावेळी मुत्सद्दी अहिल्याबाईने पाण्यासोबत त्यांना चटणी भाकरी दिल्या. अहिल्याचा नम्र व माधुरीयुक्त स्वर ऐकून मल्हाररावांना आपल्या मुलासाठी अहिल्या ही योग्य पत्नी म्हणून तसेच उत्तम सून म्हणून शोभेल याची खात्री झाली. मल्हाररावांनी पुढच्या वेळेला माणकोजी यांची भेट घेऊन आपल्या मुलाचा लग्नाचा प्रस्ताव माणकोजीकडे ठेवला. त्यानुसार अहिल्याबाईचे खंडेराव होळकर यांच्याशी बालवयात लग्न झाले. मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे सरदार होते. पेशवाई करून त्यांना हा प्रांत मिळालेला होता. मल्हारराव हे पुण्याजवळील होळ गावचे असल्याने त्यांना होळकर हे नाव पडले. मल्हाररावांनी आपल्या सुनेला सर्व प्रकारचे युद्ध कलेचे शिक्षण तज्ज्ञ शिक्षक नेमून करवून घेतले. हिंदी, संस्कृत, मोडी भाषेचे ज्ञानही अहिल्याने घेतले. राज्यकारभार कसा करावा ? त्याचप्रमाणे अनेक युद्धामध्ये त्यांनी भाग घेतला. मल्हाररावांनी आपला उत्तम वारसदार म्हणून अहिल्याबाईची निवड केली होती. अहिल्याबाई मल्हारराव राज्यकारभार करीत असताना त्यांच्यासोबत जात असत. अहिल्याबाईंनी राज्यभारभाराचे सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त केले होते. त्यामुळे राज्यकारभार करताना त्यांना कोणतीच अडचण भासली नाही. मल्हाररावांनी हयात असताना इंदोरची जबाबदारी अहिल्याबाईंकडे सोपविली होती. खंडेराव होळकर यांचा युद्धात मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी अहिल्याबाईंवर आली. त्यावेळी खंडेराव होळकर यांच्या इतर राण्या सती गेल्या. त्या सतींचे धार्मिक विधी करताना मुस्लिम राणीचा विधी करीत नसल्याचे अहिल्याबाईला लक्षात आल्यावर सर्वांना समान न्याय या हेतूने त्यांनी सर्व सती गेलेल्या प्राण्यांचा धार्मिक विधी करून घेतला. अहिल्याबाईला काही पुरोहितांनी सती जाण्याचे सुचविले. परंतु अहिल्याबाई स्वतःही रुढी विरुद्ध होत्या. तसेच मल्हारराव यांनी अहिल्यामाईला सती जाऊ दिले नाही. अहिल्याबाईनी सती न जाता राज्यकारभार सुरू ठेवला. हे पाहून एका नातेवाईकाने म्हणजे व्याहयाने सती जाण्याची परंपरा आमच्यामध्ये आहे असे अहिल्याबाईला सांगितले. अहिल्याबाईंनी कोणत्याही नातेवाईकाला अथवा पुरोहिताच्या विरोधाला न जुमानता विद्रोह केला. त्यांनी आपल्या व्
व्या ह्यायाला महिला मेल्यावर माणूस का सता का जात नाही ? असा सवाल उपस्थित केला.अहिल्याबाईंनी त्यानंतर सती प्रथा आपल्या राज्यात बंद केली. आपल्या परगण्यातील दिवाण गंगाधर पंत याला मिळणाऱ्या करातून काही हिस्सा दिला जात होता. त्याला राज्यकारभार करण्याची लालसा उफाळून आली. अशा वेळेस संयमाने अहिल्याबाईंनी स्वार्थी गंगाधर पंताला शह दिला. अनेक पुरोहितांनी अहिल्याबाई विरुद्ध कारवाया करायला सुरुवात केली. अशा वेळेस अहिल्याबाईंची गुप्तचर यंत्रणा अतिशय प्रभावी होती त्यामुळे त्यांच्याविरुद्ध चालू असलेल्या कारवायांवर त्यांनी वेळीच चांगलाच वचक बसविला होता. रघुनाथराव पेशवे याने चालवलेल्या अहिल्याबाईच्या राज्याविरुद्धच्या कारवाया अहिल्याबाईंनी खंबीरपणे तोंड देऊन त्या थांबविल्या. रघुनाथराव पेशव्यांना हत्तीच्या पायी तुडवण्याची जाहीर धमकी अहिल्याबाईंनी दिली होती. अहिल्याबाई धोरणी, स्वावलंबी, चाणाक्ष, कर्तव्यदक्ष, विवेकी राणी होत्या. आपल्या आपल्या राज्यात युद्धात सैनिकांना अद्यावत शस्त्रांचा पुरवठा व युद्धनीती शिकवण्यासाठी विदेशातील युद्ध तज्ञांची मदत घेतली. इंग्रजांची हुकूमत वाढत आहे याचा विचार करून आपल्या सेनेमध्ये योग्य ते बदल करून घेतले. अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा डाव्या हातामध्ये शंकराची पिंड घेतलेली दाखवलेली आहे. तर एका हातात बेलाचे पान दाखवले आहे. अहिल्याबाई होळकरांनी पुरोहितांविरुद्ध आवाज उठवल्याने त्यांच्या प्रतिमा विरोधकांनी धार्मिक बनविल्या. अहिल्याबाईंनी अनेक पराक्रम केले. या पराक्रमांना अंधारात ठेवण्यासाठी त्यांना मंदिरे बांधणारी राणी अशी प्रतिमा तयार केली गेली. अहिल्याबाईंच्या काळामध्ये अनेक जबाबदाऱ्या अहिल्याबाईंनी पार पाडल्या. जर त्या मंदिर बांधण्यासाठी व शिवाजी पूजा करण्यासाठी गावोगाव फिरल्या असत्या तर त्यांनी राज्यकारभार कधी केला असता ? जागोजागी त्यांचे विरोधक तैनात होते. त्यामुळे त्या अतिशय दक्षतेने वागत असत. अनेक नदी नाल्यांवर लोकांना पाण्याचा वापर करण्यासाठी योग्य सोयी नव्हत्या. आपल्या सैनिकांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी व जनतेला नदीपर्यंत जाण्यासाठी योग्य मार्ग तसेच आपल्या विधी करण्यासाठी सुविधा नव्हत्या. त्यामुळे त्यांनी अनेक नद्यांवर लोकांच्या सोयीसाठी तट बांधले. आपली राजधानी महेश्वर या सुरक्षित ठिकाणी त्या घेऊन गेल्या. इंदोर शहराचा विकास करण्यासाठी त्यांनी बाजारपेठांना संधी दिली. कापसावर चालणाऱ्या अनेक उद्योगांना प्राधान्य दिले. अहिल्याबाई होळकर या पुरोगामी विचाराच्या होत्या. त्यांनी समाजात चाललेल्या जाती पातीवर आधारीत अनिष्ठ प्रथांविरुद्ध आवाज उठविला. आपल्या स्वतःच्या कन्या मुक्ताबाई हिचा विवाह चोर दरोडेखोर यांचा बंदोबस्त करणारा यशवंतराव फणसे या युवकाशी आपल्या कन्येचा विवाह लावून दिला. हा विवाह आंतरजातीय विवाह होता. त्या काळामध्ये अहिल्याबाई होळकरांनी मनुवादी लोकांविरुद्ध उठविलेला हा बुलंद आवाज होता. अहिल्याबाईंनी धर्माधर्मात कधी तेढ निर्माण केली नाही. आपल्या राज्यात मस्जिद व मंदिर यांचा समान सन्मान केला. समतावादी विचार मांडणाऱ्या पीर ,मौलवी यांचाही सन्मान केला. राज्यकारभार अतिशय काटेकोर ठेवून चोख व्यवहारीक बंदोबस्त ठेवला. शेतीला पाणी मिळावे यासाठी अनेक बंधारे बांधण्याचे काम अहिल्याबाईंनी त्या काळामध्ये केले. माळवा प्रांत सुरक्षित ठेवून तेथील निसर्गसौंदर्य संरक्षण देऊन अबाधित ठेवले. आदिवासी लोकांना हाताला काम नसल्याने ते रस्त्यामध्ये लुटमार करीत. अशा लोकांना बंदी करून ही समस्या मिटणार नव्हती. त्यामुळे अहिल्याबाईंनी प्रत्यक्ष आदिवासी लोकांमध्ये जाऊन सुसंवाद साधला. आदिवासी लोकांना काम दिली. त्यांच्या विविध संस्कृतीचा आदर केला. काही लोकांना सैन्यामध्ये स्थान दिले. अहिल्याबाई होळकर अनंत फंदी नावाच्या शाहिराला सन्मानित केले. आपल्या राज्यात यवतमाळ करणाऱ्या लोकांनी अनंत फंदी यांना रस्त्यामध्ये अटकविले . त्यावेळी चोरांनी अनंत फंदी या कवी शाहिराला कुठे जात आहात असे विचारल्यावर त्यांनी अहिल्याबाई होळकरांकडे जात आहे असे सांगितल्यावर त्यांना सन्मानाने अहिल्याबाई होळकरांकडे घेऊन गेले. अहिल्याबाईंची आदर युक्त भीती राज्यामध्ये होती. सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या लोकांना कडक शिक्षा त्यांनी केलेली होती. त्यामुळे प्रशासन अगदी शिस्तबद्ध व कडक होते. अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात कलावंतांना राजाश्रम दिला. कापूस विणणारी यंत्रे मागून कापड निर्माण करण्याची कला कलाकारांना शिकता आली. अहिल्याबाई होळकरांचे राज्य भारताच्या बऱ्याच भागामध्ये होते. एका सम्राज्ञीने भारतभर सत्ता प्रस्थापित केली होती. आपल्या कुटुंबावर आलेली अनेक संकटे दूर सारत अहिल्याबाईने राज्यकारभार करून दाखविला. स्वतःचे पती, मुलगा, जावई, मुलगी हे सर्व निधन पावल्यावर सुद्धा अहिल्याबाई कणखर राहिल्या. अहिल्याबाईंची दूरदृष्टी ही राज्याला प्रगती प्रथावर नेणारी ठेरली.काही इतिहासकार हे धर्म, जात पाहून इतिहास लिहिणारे असल्याने अहिल्याबाईंचा इतिहास कलुषित करण्याचा प्रयत्न करीत असतात. विदेशातील इतिहासकारांनी अहिल्याबाई होळकरांबाबत अचूक माहिती लिहून ठेवलेली आहे. फार मोठी मातृसत्ताक पद्धत राबविणारी मनमिळाऊ, सत्यवादी , विवेकी व्यक्तिमत्व असलेली अहिल्याबाई होळकर एक महान राणी आपल्या देशाला लाभली. अहिल्याबाईंच्या जीवनाविषयी कर्मकांडावर आधारित लेखन करून अहिल्याबाईंच्या खरा इतिहास झाकण्याचा प्रयत्न विरोधकांनी केलेला आहे. एक राणी खूप मोठे राज्य चालवू शकते हे इतिहासातील दुर्मिळ उदाहरण आहे. केवळ धार्मिक सुधारणांमध्ये अहिल्याबाईंना अटकवून त्यांची उत्कृष्ट प्रशासक , पुरोगामी निर्भय समाज सुधारीका हा इतिहास लपविण्याचे कट कारस्थाने
काही जातीद्वेष् करणाऱ्या लोकांनी केलेला आहे. अहिल्याबाईच्या काळात नाणे तयार करणारे दोन कारखाने त्यांनी चालू केले होते. त्यांच्या राज्यात त्या नाण्यांचा वापर केला जात होता. अनेक नद्यांना जागोजागी बंधारे बांधून राज्याला पाण्याची उत्तम सोय अहिल्याबाईंनी करून ठेवल्यामुळे मध्य प्रदेशात पाण्याची मुबलकता भरपूर आहे. नर्मदा नदीच्या तीरावर पाण्याचा चांगल्या पद्धतीने वापर भाविकांना करता यावा यासाठी पाणवठे तयार केलेले आहे. आज अहिल्याबाई होळकरांनी तयार केलेल्या अनेक सुधारणांची दुर्दशा झालेली आहे. इंदोर मध्ये अनेक प्रकारचे उद्योग त्या काळामध्ये केलेल्या सुधारणांमुळे दिसून येतात. मध्यप्रदेशातील सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम अहिल्याबाई होळकर यांनी केलेले आहे. इंदोर हे एक छोटे खेडे होते. त्याला अहिल्याबाई होळकरांनी भरभराट करून पुढे इंग्रजांच्या काळात ती मोठे बाजारपेठ बनवली होती. मध्यप्रदेशातील नद्यांच्या पाण्याच्या चांगला उपयोग शेतीसाठी अहिल्याबाईंनी केला.आज उत्तम प्रकारचा गहू या राज्यामध्ये घेतला जातो. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाचा शेवट १३ ऑगस्ट १७७५ रोजी झाला. आज आपण अहिल्याबाई होळकरांना पुण्यश्लोक ही उपाधी देतो. त्या धर्मनिरपेक्ष व विज्ञानवादी विचाराच्या होत्या. पाप ,पुण्य या संकल्पना त्या मानीत नव्हत्या. प्रभावी शासन चालविणाऱ्या व्यक्ती ह्या कुण्या एका धर्माची पाठराखण करीत नसतात. अहिल्याबाई होळकरांनी धर्मनिरपेक्ष कामे केलेली आहे. इतिहासकारांनी त्यांचे चरित्र काल्पनिक पद्धतीने मांडलेले आहे. आजची पिढी यांनी अहिल्याबाईंचा खरा इतिहास जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा या व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन.

एस.एच.भवरे
उपसंपादक , साप्ताहिक लेखन मंच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *