अंबर्षी टेकडीवर RPF अधिकार्यांचा माॅर्निंगवॉक व वृक्षलागवडीचा हरित संदेश
![]()
अंबर्षी टेकडीवर RPF अधिकार्यांचा माॅर्निंगवॉक व वृक्षलागवडीचा हरित संदेश
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेरातील रेल्वे विभागातील RPF इन्स्पेक्टर श्री. सत्यजीत कुमार व सब इन्स्पेक्टर श्री. खेलसिंग मिना या अधिकारी वर्गाने रविवारी सकाळच्या ताज्या वातावरणाचा आनंद घेत अंबर्षी टेकडीवर माॅर्निंगवॉकचा उपक्रम राबवला. टेकडीवरील शांत, हिरवाईने नटलेले वातावरण अनुभवत त्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला.
यानंतर अंबर्षी टेकडी गृपच्या पुढाकाराने सर्व मान्यवर अधिकार्यांच्या हस्ते वृक्षलागवडीचा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि भावी पिढ्यांसाठी हिरवेगार वातावरण निर्माण करण्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले.
या आनंदमय प्रसंगी टेकडी गृपचे सर्व मावळे उत्साहाने सहभागी झाले होते. वृक्षारोपण करताना अधिकार्यांनी आणि उपस्थितांनी ‘एक व्यक्ती, एक झाड’ या संकल्पनेला पाठिंबा देत समाजालाही वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहित केले.
टेकडी गृपच्या मावळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली की, विविध शासकीय अधिकारी, संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी सकाळच्या माॅर्निंगवॉकसाठी टेकडीवर भेट देऊन, वृक्षलागवडीसारख्या उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजासमोर मांडावा.

