कलेच्या भक्ताचा सन्मान… आर. डी. चौधरी सरांचा सेवानिवृत्ती सोहळा दिमाखात साजरा!
1 min read

कलेच्या भक्ताचा सन्मान… आर. डी. चौधरी सरांचा सेवानिवृत्ती सोहळा दिमाखात साजरा!

Loading

कलेच्या भक्ताचा सन्मान…
आर. डी. चौधरी सरांचा सेवानिवृत्ती सोहळा दिमाखात साजरा!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कळमसरे विद्याप्रसारक संस्थेच्या शारदा माध्यमिक विद्यालयात ३९ वर्ष उत्कृष्ट सेवा बजावणारे व विद्यार्थ्यांमध्ये कलेची ओळख निर्माण करणारे आदरणीय श्री. आर. डी. चौधरी सर नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सोहळा उत्साह, भावनिकतेने आणि प्रेरणादायी शब्दांनी भरलेला ठरला.
चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणारे चौधरी सर हे विद्यार्थ्यांमध्ये ‘कला गुरु’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी राज्यस्तर, राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. इंटरमिजियट चित्रकला स्पर्धांमधून दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. त्यांनी फक्त वर्गात नव्हे तर संस्थेच्या, समाजाच्या व संघटनात्मक क्षेत्रातही अमूल्य योगदान दिले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. जाधव यांनी चौधरी सरांचा सेवा प्रवास, कुटुंब, सामाजिक योगदान यांचा सारगर्भ आढावा घेतला. माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक, कला अध्यापक संघाचे कार्यकर्ते अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या.
मान्यवरांचे दोन शब्द : आर. डी. चौधरी सरांविषयी गौरवोद्गार
श्री. महेन्द्रलाल कोठारी (अध्यक्ष, कळमसरे विद्याप्रसारक संस्था)
“चौधरी सर हे आमच्या संस्थेचा अमूल्य ठेवा आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना घडवताना शाळेचा लौकिक उंचावला. त्यांचं शांत, संयमी आणि गुणवत्तापूर्ण कार्य प्रत्येक शिक्षकासाठी प्रेरणादायी आहे.”
दादासो शालिग्राम भिरूड (अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक पतपेढी) म्हणाले की
“शिस्त, निष्ठा आणि समर्पण म्हणजे चौधरी सर. त्यांनी शिक्षक म्हणून नव्हे तर एक चळवळीचे कार्यकर्ते म्हणून कार्य केले.” अप्पासाहेब संभाजी पाटील (माजी अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक पतपेढी) म्हणाले की
“आर. डी. चौधरी सरांचा प्रत्येक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी आहे, हेच त्यांच्या कार्याचे मोठे फलित आहे.”
भाऊसाहेब आर. एच. बाविस्कर (माजी अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक पतपेढी) म्हणाले की“सेवेच्या अखेरपर्यंत चौधरी सर कार्यरत राहिले. त्यांच्या कार्याची जागा घेणे कठीण आहे.”
अँड. रघुनाथ महाले (मुंबई) म्हणाले की
“सरांच्या त्यागी स्वभावाला माझा सलाम. शिक्षण क्षेत्रात जर कोणत्याही अडचणीसाठी कायदेशीर मार्गदर्शन लागले, तर मी सदैव शाळा व संस्थेच्या पाठीशी उभा राहीन.”
प्रकाश रतीलालजी शहा (अमळनेर) म्हणाले की“शिक्षक हा समाज घडवतो आणि चौधरी सरांनी ते काम प्रामाणिकपणे पार पाडले.”
प्रकाश चौधरी (सुप्रीटेंडंट, जीएसटी –चौधरी सरांचे लहान बंधू) म्हणाले की
“सरांनी आमच्या कुटुंबाला आधार दिला. गरिबी, संघर्ष, मर्यादा असूनही त्यांनी आम्हा भावांना सक्षम बनवले.”
सौ. अश्विनी व सौ. योगिनी (चौधरी सरांच्या कन्या) मनोगतात म्हणाले कि

“वडील म्हणजे आमचे हिरो…”
शारदा माध्यमिक विद्यालयातील सेवा समाप्ती कार्यक्रमात
आर. डी. चौधरी सरांच्या दोघी कन्या – सौ. अश्विनी व सौ. योगिनी यांनी वडिलांविषयी भावना व्यक्त करताना हृदयस्पर्शी शब्द उच्चारले –
“आमचे वडील हे आमचे हिरो आहेत. त्यांनी आम्हाला जगण्याचे खरे धडे दिले.”
या दोनच ओळींनी संपूर्ण सभागृह गहिवरून गेले…आठवणींनी भरलेले त्यांचे शब्द, संघर्षाने भरलेले बालपण, आणि वडिलांच्या मोलाच्या संस्कारांची जाणीव –
हे सर्व सेवापूर्ती कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या डोळ्यांत भावनिक छाया पसरवून गेले.
डोळ्यांतून वाहणारे आनंदाश्रू… आणि मनात खोलवर पोहोचलेला संदेश – “वडील हेच जीवनाचे खरे शिल्पकार!”
संपूर्ण वातावरण क्षणभर स्तब्ध झाले आणि प्रत्येकाच्या मनात एकच भावना उमटली –
“अशाच मूल्यांनी सजलेली माणसं काळाच्या कसोटीवर खरी उतरतात.” असे सांगितले.

सन्मानाचा सोहळा : मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी प्रमुख पाहुणे आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली:
डी. ए. पाटील (अध्यक्ष, भुसावळ माध्यमिक शिक्षक पतपेढी), मंगेश भोईटे (संचालक, ग. स. पतपेढी), दिगंबर पाटील (संचालक, माध्यमिक शिक्षक पतपेढी), एस. एन. पाटील (माजी संचालक, पतपेढी),अरुण सपकाळे (सचिव, जिल्हा कला अध्यापक संघ), प्रकाश पाटील (माजी तालुकाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ),सचिन साळुंखे (माजी अध्यक्ष, साने गुरुजी पतपेढी), राजेंद्र पाटील (संचालक, साने गुरुजी पतपेढी), डि. के. पाटील (तालुकाध्यक्ष, विज्ञान मंडळ)विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संस्थेचे पदाधिकारी श्री. जी. टी. टाक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात संपूर्ण विद्यालय कुटुंब सहभागी झाले.
शेवटी, चौधरी सरांनी आपल्या भावनिक भाषणात सर्व शिक्षक सहकाऱ्यांचे, मित्रपरिवाराचे, संस्थेचे, आणि विद्यार्थ्यांचे आभार मानत “सेवा हीच माझी साधना होती आणि राहील” असे सांगून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *