टाकरखेडा गावाची शान–स्नेहल पाटील बनली पोलिस उपनिरीक्षक ; शाळेत सन्मान सोहळा संपन्न”
![]()
“टाकरखेडा गावाची शान–स्नेहल पाटील बनली पोलीस उपनिरीक्षक; शाळेत सन्मान सोहळा संपन्न”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
टाकरखेडा ता. अमळनेर येथील कन्या स्नेहल जगदीश पाटील हिने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक बनून संपूर्ण गावाचे नाव उज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, टाकरखेडा येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन भावपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले.
या प्रसंगी जितू पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्नेहलच्या देशसेवेच्या प्रवासाबद्दल माहिती देत प्रेरणा दिली. कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, माध्यमिक विद्यालय टाकरखेडा येथील शिक्षकगण, आणि गावातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री. जगतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “स्वप्न पूर्ण करण्यासाठी तीन गोष्टी गरजेच्या असतात – कॉन्फिडन्स (आत्मविश्वास), सॅक्रिफाइस (त्याग), आणि हार्डवर्क (कठीण परिश्रम).” त्यांच्या या विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
स्नेहल पाटील हिचे यश हे तिच्या कुटुंबाच्या देशसेवेमधील पार्श्वभूमीचेही प्रतीक आहे. तिचे वडील महाराष्ट्र पोलीस दलात सहाय्यक निरीक्षक, तर तिचे बाबा रेल्वे सुरक्षा दलात कार्यरत, मोठे काका आर्मी रिटायर्ड ऑफिसर, आणि लहान काका कमांडो पदावर कार्यरत आहेत. अशा देशभक्तीच्या वातावरणात वाढलेल्या स्नेहलने यशाचा वारसा पुढे चालवला आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना स्नेहलने नम्रतेने सांगितले की, “मी एक साधारण विद्यार्थिनी होते, पण ध्येय, चिकाटी आणि कठीण परिश्रम यांच्या जोरावर मी हे स्थान मिळवले.” तिच्या या शब्दांनी अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात नवे स्वप्न रुजले.
कार्यक्रमास गावचे सरपंच रामभाऊ दादा, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण कोळी, बाळू नाना, घनश्याम पाटील, डॉ. ज्ञानेश्वर, निलेश जाधव, अकबर पिंजारी, मुख्याध्यापक मनोज पाटील, सर्व अंगणवाडी सेविका, ह.भ.प. कैलास महाराज, किरण पाटील व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
ह.भ.प. कैलास महाराज यांनी आपल्या भाषणात सांगितले, “ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे, कारण त्याचे वाटप केल्याने ते कमी होत नाही, उलट वाढते.” त्यांच्या या वचनाने कार्यक्रमाचा भारदस्त समारोप झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली देवरे मॅडम यांनी अत्यंत रसाळ भाषेत केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती रेखा मराठे यांनी केले.
स्नेहलच्या यशाची प्रेरणादायक कहाणी आजच्या तरुण पिढीला स्वप्न बघण्याचे आणि ती पूर्ण करण्याचे बळ देते. तिच्या वाटचालीकडे पाहून हे नक्कीच म्हणता येईल की – “ध्येय मोठं असेल तर प्रवासही मोठाच असतो.”



सर खूपच आभारी आहे बातमी शब्दांकन एकदम छान केले.