शिक्षक तक्रार निवारण सभेत शिक्षणाधिकाऱ्यांची ‘नो पेंडिंग सिस्टीम’ ची ग्वाही, आलेल्या सर्व तक्रारींचा तत्परतेने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निपटारा
![]()
शिक्षक तक्रार निवारण सभेत शिक्षणाधिकाऱ्यांची ‘नो पेंडिंग सिस्टीम’ ची ग्वाही
आलेल्या सर्व तक्रारींचा तत्परतेने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निपटारा
अमळनेर प्रतिनिधी
शिक्षक आमदार माननीय किशोर भाऊ दराडे यांच्या शिक्षक संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून 26 मे 2025 रोजी एरंडोल येथे पार पडलेल्या शिक्षक तक्रार निवारण सभेतील उर्वरीत प्रकरणांची व नव्याने आलेल्या प्रकरणांची सभा आज दिनांक 24 जून 2025 रोजी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या दालनात संपन्न झाली. शिक्षणाधिकारी माननीय कल्पनाताई चव्हाण यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात तत्परता दाखवत सर्व प्रश्नांचा अवघ्या दीड तासात निपटारा केला. समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ व समन्वय समितीचे मार्गदर्शक डॉक्टर मिलिंद बागुल यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. सदर प्रसंगी उपशिक्षणाधिकारी माननीय फिरोज पठाण, उपशिक्षणाधिकारी माननीय रागिनी चव्हाण, अधीक्षक प्रतिभाताई सुर्वे व शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी कल्पनाताई चव्हाण यांनी विविध विभागातील संबंधित अधिकारी यांच्याशी विविध प्रकरणांच्या अनुषंगाने स्वतः संवाद साधत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले. गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झालेल्या संस्थांमध्ये चौकशी अधिकारी नेमून चौकशीचा कार्यक्रम निश्चित केला. पात्र शिक्षकांचे वेतन डावलून संस्थांमार्फत काढली जाणारी वेतन देयके त्वरित थांबवण्यात येतील अशा पद्धतीचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन प्रस्ताव न पाठवलेल्या शाळांसंदर्भात कडक कारवाई करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. पात्र शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव हेतूपुरस्काररित्या संस्थांमार्फत डावलले जात आहेत, अशा प्रकरणी ठोस कारवाईचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. मागील काही महिन्यांपासून शिक्षकांचे पगार उशिरा होत असल्या संदर्भात शिक्षणाधिकारी यांनी तातडीने प्रयत्न करून शिक्षकांचे पगार वेळेवर करण्याचे आश्वासन दिले. भविष्य निर्वाह निधी व इतर प्रलंबित देयके लवकरच निकाली काढणार असल्याचे आश्वासन त्यांनी शिष्ट मंडळाला दिले. समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भारत शिरसाठ व समन्वय समितीचे मार्गदर्शक डॉक्टर मिलिंद बागुल यांनी संस्थांमध्ये काम करीत असताना शिक्षकांना सामोरे जावे लागलेल्या अनेक समस्यांकडे शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. सदर प्रसंगी समता शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे, महानगराध्यक्ष टी.बी. पांढरे, सचिव वर्षा अहिरराव, तालुकाध्यक्ष प्रज्ञा तायडे, सहसचिव प्रकाश तामस्वरे, चेतन नवगिरे, पी.डी.पाटील तसेच अनेक तक्रारदार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.चौकट
शिक्षक अतिरिक्त असलेल्या शाळांमधील वेतनाचा प्रश्न जटील झाला असून याप्रकरणी अधिकाऱ्यांनी योग्य ती सुनावणी घेऊन सेवा जेष्ठ शिक्षकांना संस्थेमार्फत अतिरिक्त केले जात आहे का, याचा शोध घ्यावा अशी मागणी समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांनी सभेत केली.

