कल्याण पश्चिमसाठी खुश खबर: कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार – शहरप्रमुख रवी पाटील* *खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून एमएमआरडीएच्या बैठकीत नव्या मार्गाचा डीपीआर मंजूर*
![]()
*कल्याण पश्चिमसाठी खुश खबर: कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार – शहरप्रमुख रवी पाटील*
*खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून एमएमआरडीएच्या बैठकीत नव्या मार्गाचा डीपीआर मंजूर*
ठाणे:कल्याण दि.(मनिलाल शिंपी) :
मेट्रो रेल्वेसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत कल्याण मेट्रो 5 च्या नव्या मार्गाच्या डीपीआरला मंजुरी देण्यात आली. तसेच या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाल्याने मेट्रोचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली. कल्याण मेट्रो 5 प्रकल्पासह इतर महत्त्वाच्या विषयांवर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मेट्रो 5, मेट्रो 12 आणि मेट्रो 14 च्या प्रकल्पाचा आढावा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या आणि एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत एका बैठकीत घेण्यात आला. ऑक्टोबर 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कल्याण मेट्रो 5 चे भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र या प्रकल्पाच्या तत्कालीन मार्गावरून झालेल्या मतांतरामध्ये हा प्रकल्प अडकून पडला. पूर्वी ही मेट्रो ज्या मार्गाने म्हणजेच लालचौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी जाणार होती. मात्र या मार्गाऐवजी ती लालचौकी, आधारवाडी, खडकपाडामार्गे नेण्याची मागणी शिवसेना नेते रवी पाटील यांनी लावून धरली. आणि या मागणीला आता यश आले असून खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत या नव्या मार्गाच्या डीपीआरला मंजुरी मिळाल्याची माहिती रवी पाटील यांनी यावेळी दिली. तसेच लवकरच या कल्याण मेट्रो 5 ची निविदा प्रक्रियाही काढली जाणार असल्याने त्याच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीचा मार्ग हा अयोग्य असल्याने आम्ही तो बदलण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि 9 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर त्याला यश आला असून त्याचा लाखो नागरिकांना फायदा होणार असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
कल्याण मेट्रो 5 चा असा असणार नवा मार्ग…
कल्याण मेट्रो 5 ही आता लालचौकी, सहजानंद चौकाऐवजी दुर्गाडी चौक, आधारवाडी, खडकपाडा, बिर्ला कॉलेज, भवानी चौक, सुभाष चौकमार्गे कल्याण स्टेशनपर्यंत जाणार आहे. कल्याण पश्चिमेतील गुरुदेव हॉटेलजवळ असलेल्या मेट्रो 12 च्या स्टेशनला ती जोडली जाणार असल्याचेही रवी पाटील यांनी सांगितले.

