मुंबई शिक्षक मतदार संघातील उबाठा गटाचे आमदार जे एम अभ्यंकर यांचा अर्ज मा मुंबई हायकोर्टाने फेटाळला.*
![]()
*मुंबई शिक्षक मतदार संघातील उबाठा गटाचे आमदार जे एम अभ्यंकर यांचा अर्ज मा मुंबई हायकोर्टाने फेटाळला.*
मुंबई शिक्षक मतदार संघात जून 2024 रोजी झालेल्या निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार श्री जे एम अभ्यंकर विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावरील शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष सावित्री किसन मोरे यांनी या निकालाला मा हायकोर्टात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान दिले होते. परंतु उबाठा गटाचे उमेदवार श्री अभ्यंकर यांनी श्री सुभाष मोरे यांची याचिका फेटाळण्याची मागणी अर्जाद्वारे मा. हायकोर्टाकडे केली होती. मा हायकोर्टात 19 मार्च 2025 रोजी झालेल्या युक्तिवादा दरम्यान श्री अभ्यंकर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील श्री एम एम वशी यांनी श्री सुभाष मोरे यांची निवडणूक याचिका फेटाळली जावी यासाठी युक्तिवाद केला होता. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाल्यावर न्यायाधीश श्रीमती गौरी गोडसे यांनी निकाल राखून ठेवला होता.
दिनांक 9 मे 2025 रोजी मा हायकोर्टाच्या न्यायमूर्ती श्रीमती गौरी गोडसे यांनी आमदार अभ्यंकर यांचा निवडणूक याचिका रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज फेटाळला. तसेच सुभाष मोरे यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय दिला आहे. श्री सुभाष मोरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील श्री राजीव पाटील आणि श्री सचिन पुंदे यांनी मा हायकोर्टात बाजू मांडली होती.
*सुभाष मोरे यांच्या याचिकेत काय आहे?*
मुंबई शिक्षक मतदार संघाचा निकाल 1 जुलै 2024 रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत पहिल्या फेरीच्या मतमोजणी दरम्यान विजयी उमेदवार श्री अभ्यंकर यांना 3079 मते तर श्री सुभाष मोरे यांना 3011 मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमध्ये केवळ 68 मतांचा फरक होता. हा फरक शेवटून दुसऱ्या फेरीत 208 मतापर्यंत गेला. श्री सुभाष मोरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत श्री जे अभ्यंकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मुख्याध्यापकामार्फत 587 अपात्र मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप केला आहे. तसेच या अपात्र मतदारांमध्ये प्लेग्रुप, माॅन्टेंसरी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि काही शिक्षकेतर कर्मचारी यांची नोंदणी करण्यात आली आहे. काही मतदार असे आहेत की ज्यांचे वय 18 ते 25 वर्ष असून त्यांना किमान तीन वर्षाचा शिकवण्याचा अनुभव नाही. श्री अभ्यंकर सल्लागार असलेल्या अथवा विश्वस्त मंडळात असलेल्या शाळांमधून अपात्र मतदारांची नोंदणी झालेली असल्यामुळे श्री अभ्यंकर यांची निवड रद्द करून दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार श्री सुभाष मोरे यांना विजयी करावे अशी मागणी याचिकेत केलेली आहे. मा हायकोर्टाने श्री सुभाष मोरे यांची याचिका दाखल करून त्यांनी याचिकेद्वारे केलेल्या आरोपांची शहानिशा करण्याचे मान्य केले आहे.
*मा हायकोर्टाचे मत*
“the pleadings in the petition indicate sufficient material particulars regarding the objections raised to the alleged illegal addition of the ineligible persons as electors. The averments, if proved, will materially affect the election result. Thus the material particulars pleaded in the petition would constitute a sufficient cause of action that warrants a trial. Hence, the eletion petition cannot be rejected at the threshold under order VII Rule 11 of CPC.
*माजी आमदार कपिल पाटील यांची प्रतिक्रिया*
उबाठा गटाचे आमदार अभ्यंकर यांनी नोंदविलेले 587 अपात्र मतदार वगळल्यास मुंबई शिक्षक मतदार संघातून सुभाष मोरे यांचा विजय स्पष्ट आहे. मुंबईतील शिक्षकांनी नेहमीच शिक्षक भारती संघटनेवर विश्वास दाखविला आहे. मुंबईतील शिक्षकांना मा हायकोर्टात न्याय मिळेल याची खात्री आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार कपिल पाटील यांनी दिली.

