अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आयुक्त श्री.कैलास पगारे यांच्याशी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा*
![]()
*अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आयुक्त श्री.कैलास पगारे यांच्याशी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा*
राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री.कैलास पगारे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी नवीन प्रशासकीय इमारत मंत्रालय मुंबई येथे बैठक बोलाविली होती.
सदर बैठकीत अंगणवाडी केंद्राच्या वेळेबाबत सुसूत्रता नसून कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्राची वेळ निश्चित करावी अशी मागणी करण्यात आली. यावर आयुक्त, एबाविसे योजना रायगड भवन नवी मुंबई यांनी वेळेबाबत येत्या आठ दिवसांत सविस्तर पत्र काढून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना होणारा त्रास बंद केला जाईल असे सांगितले.
राज्यातील बहूसंख्य ठिकाणी CBE ची रक्कम थकित आहे ती तात्काळ दिली पाहिजे. यावर कार्यक्रम केल्यानंतर त्याची नोंद पोषण ट्रॅकरमध्ये वेळेवर होणे गरजेचे आहे.थकित रकमेबाबत माहिती घेऊन ती तात्काळ अदा करणेबाबत संबंधितांना आदेशित केले जाईल.असेही आयुक्त श्री.पगारे यांनी स्पष्ट केले.
राज्यात अंगणवाडी केंद्राच्या सर्व कामांची नोंद मोबाईल पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये करावी अशा सुचना असूनही बहुसंख्य ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रजिस्टर भरण्याची सक्ती केली जात आहे.
चर्चेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोबाईलवर सर्व काम करायचे आहे तसेच रजिस्टर वरील नोंदी बंद करण्याबाबत लवकरच क्षेत्रीय कार्यालयांना पत्र दिले जाईल.
फेस रिकगनेशन करण्यासाठी कुटुंबातील ठराविक व्यक्ती हजर नसल्याने लाभार्थ्यांना मिळणाऱ्या पूरक पोषण आहारात खंड पडून कुपोषणाचे प्रमाण वाढू शकते. म्हणून कुटुंबातील एकापेक्षा जास्त किंवा एकाच कुटुंबातील कमीत कमी 3 व्यक्तींचा समावेश फेस रिकग्नेशन पर्याय देण्याबाबत संघटनेच्यावतीने मागणी करण्यात आली. त्यावर पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याने त्यांचेकडे पत्र व्यवहार केला जाईल.
मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागु करण्यात यावी तसेच सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेंशन देण्यात यावी अशीही आग्रही मागणी केल्यावर ग्रॅज्युटी आणि पेंशन देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.संघटनेने केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करावा असे सुचविले. त्यावर पाठविलेल्या प्रस्तावाची प्रत संघटनेला द्यावी अशी मागणी संघटनेने केली दोन्ही प्रस्तावाच्या प्रति संघटनेला दिल्या जातील असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाची भर पगारी रजा देण्याबाबतचाही प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला असल्याचे बैठकीत सांगितले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून बेबी केअर किट आणावे लागत आहेत.त्यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो.महिला कर्मचाऱ्यांना खर्च होणार नाही याची काळ्जी घेतली जाईल आणि नवीन टेंडर मध्ये सुधारणा करून बेबी केअर किट अंगणवाडी केंद्रपर्यंत पोहोचबाबत आदेशित केले जाईल.
नागरी विभागात गेल्या आठ महिन्यांपासून अंगणवाडी केंद्रांचे भाडे थकित आहे.यावर थकित घरभाड्याबाबत मागणी तपासून तात्काळ रक्कम संबंधितांकडे वर्ग केली जाईल.
तसेच महागाईचा विचार करता इंधन खर्च ६५ पैसे अत्यल्प असून त्यात वाढ झाली पाहिजे इंधन दरामध्ये लवकरच वाढ करण्यात येणार आहे.असेही बैठकीत नमुद करण्यात आले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेच्या केलेल्या कामाचा मोबदला मिळावा म्हणून संघटनेमार्फत सातत्याने पाठपुरावा केला जात होता. लाडकी बहीण योजनेच्या कामाचा मोबदल्याची लागणारी रक्कम दोन दिवसांपूर्वी संबंधितांकडे वर्ग केली असल्याची माहिती दिली.अंगणवाडी कर्मचारी योजनेची सर्व कामे 100% करतात. त्यामुळे प्रोत्साहन भत्ता मानधनात सरसकट जोडण्यात यावा. अशीही आग्रही मागणी संघटनेने केली.
सदरची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत आयुक्त कैलास पगारे,उपायुक्त विजय क्षीरसागर,श्रीमती संगीता लोंढे, यांच्यासह वरीष्ठ अधिकारी तसेच संघटनेच्या मायाताई परमेश्वरसह आदी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

