सोयीचे घ्यायचे अन् राजकारण करायचे*  *ही जितेंद्र आव्हाडांची वृत्ती नव्हे प्रवृत्तीच*  *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे टिकास्त्र*
1 min read

सोयीचे घ्यायचे अन् राजकारण करायचे* *ही जितेंद्र आव्हाडांची वृत्ती नव्हे प्रवृत्तीच* *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे टिकास्त्र*

Loading

*सोयीचे घ्यायचे अन् राजकारण करायचे*

*ही जितेंद्र आव्हाडांची वृत्ती नव्हे प्रवृत्तीच*

*भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे टिकास्त्र*

मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी एक्स अकाऊंटवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोस्ट केली होती. यावर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सोयीचे घ्यायचे आणि राजकारण करायचे ही जितेंद्र आव्हाडांची वृत्ती नव्हे तर प्रवृत्तीच आहे, अशी टीका केली.

माध्यमांशी बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, जर आरोप सिद्ध झाला नाही तर पक्ष नेतृत्व आपल्या लोकप्रतिनिधीच्या, सहकाऱ्याच्या मागेच उभं राहते. तथापी अजित पवार बोललेले जितेंद्र आव्हाड यांनी ऐकले नाही किंवा ऐकूनही न ऐकल्यासारखे करताहेत. जर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रवृत्ती असतील आणि त्यात कोणीही असो, कुणालाही माफ केले जाणार नाही. कठोर कारवाई होईल. जे खंडणीसंदर्भात असतील त्यांच्यावर मकोका लावेन अशी भुमिका अजित पवारांनी घेतलीय. सोयीचे घ्यायचे आणि राजकारण करायचे ही जितेंद्र आव्हाडांची वृत्ती, प्रवृत्तीच आहे.

तसेच आरोपीना कठोर शासन होणे महत्वाचे आहे. बीड जिल्ह्यातील लोकांचा तो उद्रेक आहे. जनभावनांचा आदर झालाच पाहिजे परंतु अजून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झाला नाही, त्याचे काही धागेदोरे त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत तर त्यांना लगेच गुन्हेगाराला साथ आहे म्हणून राजीनामा द्या असे सांगणे, हे संयुक्तिक होऊ शकत नाही, असेही आ. दरेकर म्हणाले.

विरोधकांकडून होत असलेल्या ईव्हीएमच्या आरोपांवर आ. दरेकर म्हणाले कि, महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने तपशीलवार भुमिका स्पष्ट केली आहे. शिळ्या कडीला ऊत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ईव्हीएमवर काँग्रेसने अनेक राज्ये जिंकली आहेत. सुप्रिया सुळे जिंकल्या आहेत. नांदेडची पोटनिवडणूक जिंकली आहे. आपण जिंकलो तर ईव्हीएम दोषी नाही. ईव्हीएमच्या माध्यमातून राजकारण सुरू आहे. जनतेच्या दरबारात जाऊन सामाजिक सेवेचे राजकारण करा, असे रडीचे डाव खेळू नका, असा टोला आ. दरेकरांनी ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना लगावला.

पालकमंत्री पदाच्या वादावार आ. दरेकर म्हणाले कि, पालकमंत्री हा काही जीवन मरणाचा विषय नाही किंवा भारत-पाकिस्तानचा वाद नाही. तर जनतेच्या सेवेचे माध्यम आहे. त्यासाठी कुणी प्रतिष्ठा करू नये. ज्या पद्धतीने राज्यातील जनतेने महायुती म्हणून आपल्याला जनाधार दिलाय त्या जाणीवेने सगळ्यांनी वागले पाहिजे.

नाना पटोले यांच्या विधानावर बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, आपल्या पक्षात किती गुन्हेगार आहेत ते शोधून काढावे मग दुसऱ्याकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न करा. एक बोट दाखवत असताना चार बोटं आपल्याकडे आहेत, आपले सहकारी गुन्हेगारीने बरबटले आहेत त्याचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करावी.

*जनतेला भाजपा-शिवसेना*

*हे चांगले व्यासपीठ वाटते*

दरेकर म्हणाले कि, महाविकास आघाडीच्या पक्षांत आत्मविश्वास राहिलेला नाही. जे चांगले नेते, कार्यकर्ते आहेत ते चांगल्या पक्षाची वाट धरत असतात. त्यामुळे शिंदे यांच्या पक्षात लोकांचा ओढा आहे. आमच्याही पक्षात लोकांचा ओढा आहे. लोक चांगले व्यासपीठ बघत असतात. त्यांना भाजपा-शिवसेना हे चांगले व्यासपीठ वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *