योग निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली – प्रा.डॉ.राहुल निकम भगिनी मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागातर्फे मिशन साहसी अभियान
![]()
योग निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली – प्रा.डॉ.राहुल निकम
भगिनी मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागातर्फे मिशन साहसी अभियान
अमळनेर प्रतिनिधी
योग हा निव्वळ कसरतीचा किवा शारीरिक लवचिकतेचा प्रकार नसून तो नियमित जीवनशैलीचा भाग आहे. नियमित योगाने शरीर, मन आणि बुद्धीचा विकास होतो. नियमित योगामुळे व्यक्तीच्या आचारात आणि विचारात अमुलाग्र परिवर्तन होते, आणि त्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत जातो. योगामुळे शरीर व मनाची शुद्धता वाढते आणि त्यातूनच निरामय आरोग्य लाभते. योग हीच निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे मत समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील प्रा.डॉ.राहुल निकम यांनी व्यक्त केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, अंतर्गत विद्यार्थी विकास विभाग आणि भगीनी मंडळ चोपडा संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवती सभेअंतर्गत मिशन सहासी अभियान कार्यशाळेत मानवी जीवनातील योगाचे महत्त्व आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर ते बोलत होते. सदर कार्यशाळा विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयातील ५५ विद्यार्थिनी त्यात सहभागी झाल्या होत्या.
या वेळी बोलताना प्रा.डॉ.राहुल निकम यांनी योगाच्या आठ अंगांचा थोडक्यात परिचय शिबिरार्थिना करून दिला. विविध आसनांची उपयुक्तता सांगितली. प्राणायामाचे महत्व सांगून कपालभाती, भास्रिका, अनुलोम विलोम, सूर्यभेदन, चंद्रभेदन इ.प्राणायाम शिबिरार्थिणा स्वतः करून दाखविले आणि त्यांच्याकडून करून घेतले.
यावेळी या कार्यशाळेचे समन्वयक आणि विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.तुषार बाविस्कर, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.भाग्यश्री महाजन, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.अनिल बाविस्कर, प्रा.गोपाल बडगुजर, प्रा.एकता अग्रवाल, प्रा.सेजल शहा प्रा.राधा गुजराथी, प्रा.अरमान पठाण, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.डॉ.मारोती गायकवाड, प्रा.डॉ.उत्तम सोनकांबळे, प्रा.डॉ.संबोधी देशपांडे, प्रा.डॉ.मोहिनी उपासनी, प्रा.कल्पना सोनवणे, श्रीमती रुपाली गुजराथी आदी मान्यवर हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल बाविस्कर यांनी केले यातून कार्यक्रमाचा उद्देश त्यांनी सांगितला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी करीना माळी हिने केले तर रूपाली देशमुख हिने आभार मानले.


