स्मृतीशेष निशिकांत मिरजकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
![]()
स्मृतीशेष निशिकांत मिरजकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
2006 ला माझा “कवितेचे दिवस” हा कवितासंग्रह सुविद्या प्रकाशनाचे अनंत पुराणिक यांनी प्रकाशित केला होता. सन्मित्र साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त “बारोमास “लेखक सदानंद देशमुख यांनी सूचक मलपृष्ठावर अभिप्रायही दिला होता. हा कवितासंग्रह मी दिल्ली येथे दिल्ली विद्यापीठात मराठीचे अध्यापन इंग्रजीतून जगातील मराठी भाषा विषय शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी करत असलेले प्रा. निशिकांत मिरजकर यांना सस्नेह पाठवला होता. त्या संग्रहावर अनपेक्षित अभिप्रायही सरांनी तात्काळ पाठवण्याचा मला मनःस्वी आनंद झाला होता. तो माझ्या कवितेचे मर्म अधोरेखित करणारा होता. माझ्या कवितेला बळ देणाराही ठरला. देशाच्या राजधानीत आलेले हे पहिले आणि शेवटचे आजपर्यंतचे ठरलेय. म्हणून ते मी ऐतिहासिक दस्तावेज म्हणून जपूनही ठेवलेय. वयाच्या सत्तर वर्षापर्यंत अध्यापन करणारे ते एकमेव प्राध्यापक होते. जगातील अनेक विद्यार्थ्यांना शिकवणारे बहुधा ते एकमेव प्राध्यापक असावेत. अतिशय प्रेमळ, उर्जा आणि दिशा देणारे ते खरे मार्गदर्शक गुरूवर्य होते. माझ्यावर आणि माझ्या कवितेवर निस्सीम प्रेम करणारे माझेही ते गुरूवर्य होते. सेवानिवृत्तीनंतर सर पुणे येथे स्थायिक झालेले होते. मराठीत साहित्य प्रातांत मराठीतील नामवंत लेखक म्हणून अधोरेखित झालेले होते. माझे सन्मित्र डाॅ.मनोहर जाधव यांचे मुळेच त्यांचंही प्रत्यक्षात भेट पुणे येथे त्यांचे रहाते घरी झाली होती. निमित्त होते,माझे सन्मित्र प्राध्यापक डाॅ. जगदीश पाटील यांनी माझा “बेट बंद भावनेचे” या कवितासंग्रहाचा अनुवाद इंग्रजीतून An Isle of pent up Emotions केलेला होता. त्यावर प्रस्तावनेसाठी सरांना विनंती करण्यासाठी मी,डाॅ.जगदीश पाटील,प्रशांत धांडे आणि माझे सहकारी योगिराज मराठेंसह पुणे येथे गेलो होतो. त्यांचे घरी प्रथमच त्यांनी. केलेल्या आदरतिथ्य आदरतिथ्याने भारावून गेलो होतो. अनुवादित कवितासंग्रहावर मौलिक सूचनांही स्वीकारून स्वीकारून आम्ही आनंदाने परतलो होतो. प्रस्तावनेची फार काळ प्रतीक्षा करावी लागली नाही.आठ दिवसातच सरांनी अंतर्भॅदी अभिप्रायपर प्रस्तावना पाठवली होती. सामाजिक जाणिवेतून कविता लिहिणारा मी तरल प्रेम जाणिवेची तरल संवेदनशील जीवनदर्शी कविताही हृदयस्पर्शी लिहू शकतो. ही बाब सरांनी अधोरेखित केली होती. पारदर्शी आणि उत्तम अनुवाद झाल्याचेही सूचित केल्याने. मी आणि डाॅ.जगदीश पाटील सर आनंदलो होतो. पुढे हे पुस्तक सायन प्रकाशनचे मित्रवर्य नितीन कोत्तापल्ले यांनी सुबक आणि देखणे काढलेही. पुढे सरांची माझी व्हाट्सपवर मैत्री जमली. मी पाठवलेल्या कवितेवर नियमित अभिप्राय सत्वर येत असत. त्यांनाही त्यांचा कवितासंग्रह काढायचाय. असा मनोदय ते व्यक्त करीत असत. त्यांचा तो मनोदय पूर्ण झाला.पण थोडा उशीरच झाला. अलीकडे त्यांचा मेसेज येणे अनियमित झाले होते. करोना साथीमुळे संपर्क कमी झाला होता. आजारपण आणि वृद्धपणाने संपर्क होत नव्हता. मित्रवर्य एकनाथ आव्हाड यांच्याकडून सरांच्या अकस्मात जाण्याची बातमी आली आणि सुन्नच झालो. खूप उदासलो आहे. सरांच्या भेटीतील स्मृती जागवतोय.सरांना आदरपूर्वक संवेदनशील श्रद्धांजली !🪷👏
शशिकांत हिंगोणेकर
7218792186

