शिक्षकांची ‘ज्ञानेश्वर माऊली’ ठरलेले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्याला मिळवून दिला शालार्थ आयडी; एका कुटुंबाला दिलासा
1 min read

शिक्षकांची ‘ज्ञानेश्वर माऊली’ ठरलेले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्याला मिळवून दिला शालार्थ आयडी; एका कुटुंबाला दिलासा

Loading

शिक्षकांची ‘ज्ञानेश्वर माऊली’ ठरलेले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे

अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्याला मिळवून दिला शालार्थ आयडी; एका कुटुंबाला दिलासा

माणगाव : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणींना धावून जाणारे, माणुसकीचा आधार देणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची ओळख निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची आत्मीयता आणि संवेदनशील कार्यपद्धती याची प्रचिती पुन्हा एकदा आली असून, अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या युवकाला शालार्थ आयडी मिळवून देत त्यांनी एका कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावला आहे.

लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिर, साई ता. माणगाव येथील शिपाई कै. जयदास लक्ष्मण अधिकारी यांचे २० ऑगस्ट २०२२ रोजी आकस्मिक अपघातात दुःखद निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर अधिकारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्या कठीण परिस्थितीत साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने अनुकंपा तत्त्वावर त्यांचा मुलगा स्वप्नील जयदास अधिकारी याची त्याच विद्यालयात शिपाई पदावर नियुक्ती केली.

मात्र शासकीय प्रक्रिया आणि तांत्रिक बाबींची पुरेशी माहिती नसल्याने संबंधित प्रस्ताव रखडला होता. या वेळी संस्था सचिव गणेश पवार यांनी पुढाकार घेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून फाईल तयार केली. सदर प्रस्ताव शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अलिबाग येथे सादर करण्यात आला. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी प्रस्तावास मान्यता दिली. त्यावेळी शिक्षण अधीक्षक सुभाष शिंदे यांनीही मोलाचे सहकार्य केले.

यानंतर शालार्थ आयडीसाठी फाईल उपसंचालक कार्यालय, मुंबई येथे पाठविण्यात आली. मात्र प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता. दरम्यान, ३ मे २०२६ रोजी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माणगाव दौऱ्यावर आले असता, शिवछत्रपती संघटनेचे संपर्क प्रमुख राजेंद्र पवार, महाड तालुका अध्यक्ष शहाजी बेरे, माणगाव तालुका अध्यक्ष सुतार सर यांच्या उपस्थितीत संस्था सचिव गणेश पवार यांनी स्वप्नील अधिकारी यांच्या शालार्थ आयडीचा विषय आमदार म्हात्रे यांच्यासमोर मांडला.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी स्वतः लक्ष घालून पाठपुरावा केला आणि अखेर १४ मे २०२६ रोजी स्वप्नील अधिकारी यांना शिपाई पदाचा शालार्थ आयडी मंजूर झाला. त्यामुळे अधिकारी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या उपजीविकेचा मार्ग सुकर झाला आहे.

या कामासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, उपसंचालक राजेश ककाल, शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, संस्थेचे अध्यक्ष गजानन अधिकारी, उपाध्यक्ष बळीराम लाड, शिवछत्रपती संघटनेचे राजेंद्र पवार, शहाजी बेरे, सुतार सर, संस्था सचिव गणेश पवार तसेच मुख्याध्यापिका सौ. सुजाता म्हात्रे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल स्वप्नील जयदास अधिकारी व गणेश पवार यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *