आमचं संविधान आमचा स्वाभिमान – प्रा.डॉ.राहुल निकम
![]()
आमचं संविधान आमचा स्वाभिमान – प्रा.डॉ.राहुल निकम
जळगांव प्रतिनिधी
आमचं संविधान आमचा स्वाभिमान असून तो मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे. भारतीय संविधानामुळेच आज संपूर्ण भारतात अठरा पगड जातीची लोक गुण्यागोविंदाने राहत असून संविधान आमचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. ग्रामपंचायती पासून ते लोकसभेपर्यंतचा संपूर्ण कारभार हा संविधानाच्या माध्यमातून होत असून हे संविधान समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असे प्रतिपादन प्रा.डॉ.राहुल निकम यांनी केले. ते समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिरात भारतीय संविधानाचे हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भारतीय संविधानाचे महत्त्व या विषयावर बोलत होते. सदरचे शिबिर हे शासकीय प्राथमिक आश्रम शाळा, विष्णापूर तालुका चोपडा येथे बोलत होते.
यावेळी बोलताना प्रा.डॉ. राहुल निकम यांनी आजच्या काळातील भारतीय संविधानाचे महत्त्व आणि आजची सामाजिक परिस्थिती यावर प्रकाशझोत टाकला. भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत हक्क आणि कर्तव्य राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांना समजावून सांगितले. यावेळी विचार पिठावर समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.संबोधी देशपांडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.उत्तम सोनकांबळे, प्रा.डॉ.मारोती गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे 50 स्वयंसेवक या शिबिरासाठी उपस्थित होते. व्याख्यानाचे शेवटी प्रश्नोत्तरे झाले. या कार्यक्रमाबद्दल समाजकार्य महाविद्यालय चोपडा आणि शासकीय प्राथमिक आश्रम शाळा विष्णापूर तालुका चोपडा यांच्यावतीने समाधान व्यक्त करण्यात आले.

