डॉ. संभाजी खराट लढवय्या सत्यशोधक- इतिहासकार डॉ. उमेश बगाडे
![]()
डॉ. संभाजी खराट लढवय्या सत्यशोधक-
इतिहासकार डॉ. उमेश बगाडे
छत्रपती संभाजीनगर :- जो सत्य शोधतो तो सत्यशोधक, विषमतेविरुध्द लढतो तो सत्यशोधक, जो विद्रोह करतो तो सत्यशोधक या परंपरेतील महाराष्ट्रातील सत्यशोधक विचारवंत व साहित्यिक, सत्यशोधकी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, पत्रकार डॉ. संभाजी खराट होते. असे प्रतिपादन आदरांजली सभेचे अध्यक्ष प्रसिद्ध इतिहासकार डॉ. उमेश बगाडे यांनी महात्मा गांधी भवन येथे आयोजित आदरांजली सभेत केले. ते पुढे बोलताना म्हणाले की, दिनमित्र मुकूंदराव यांच्या पत्रकारितेवर त्यांची पीएचडी आहे. ज्या प्रमाणे मुकूंदराव पाटिलांनी पत्रकारिता जनहितसाठी केली. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. प्रजेच्या हितासाठी डॉ. संभाजी खराट यांनी वाचन लेखन संशोधन केले आहे. सत्यशोधक शिक्षक सभा, भारतीय पिछडा शोषित संघठन, सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि इतर पुरोगामी संघटनांनी सदर सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी विचारमंचावर जेष्ठ साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुलेकर, ऍड. विष्णू ढोबळे, वर्षाताई खराट, माजी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव आदींची उपस्थिती होती. डॉ. प्रल्हाद लुलेकर म्हणाले की डॉ. संभाजी खराट हे एक तरलमनाचे सह्रदयी माणूस होते. सत्यशोधक चळवळीत अशी माणस फार दूर्मिळ आहेत. ते लोकराज्य संपादक असतांना नाविण्यपूर्ण अंक काढले. याप्रसंगी ऍड. विष्णू ढोबळे म्हणाले की, सध्या देशात संविधानाच्या नावाने गाजावाजा चालु आहे परंतु संविधानविरोधी धोरण सत्ताधारी वर्ग राबवत आहे. अशा परिस्थितीत सत्यशोधक डॉ. संभाजी खराटाचे जाणे वेदनादायी आहे. अशा परिस्थितीत त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी सत्यशोधक चळवळ जोमाने पुढे नेणे गरजेचे आहे.
कृतिशील सत्यशोधक संभाजी खराट यांचे दि. ११ डिसेंबर २०२४ रोजी दुःखद निधन झाले. ते साहित्यिक, कार्यकारी संपादक होते तसेच उपसंचालक म्हणून विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर येथून निवृत्त झाले. उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचे महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, कै. नरहर कुरुंदकर पुरस्कार, नेहरू युवा पुरस्कार, शब्द शिल्प पुरस्कार आदि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांची जवळपास तीस पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भारतात समतावादी सामाजिक क्रांती घडवून आणणाऱ्या फुले,शाहू, आंबेडकरी प्रबोधन चळवळीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने सत्यशोधक चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित करण्यात यावे. अशी भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. अनिताताई देवतकर, संताजी खराट, भाऊसाहेब जाधव, डॉ. प्रल्हाद लुलेकर, अरविंद खैरनार, ऍड विष्णू ढोबळे, डॉ. कालिदास भांगे, पंकज टाकळखेडे, जयप्रकाश शित्रे, सुलभा मुंढे, काॅ.एस. बी. टाकळखेडे, नवनाथ गोरे, भारत सिरसाट, काॅ. अण्णा सावंत, सुभाष महेर, डॉ. श्याम कदम संतोष विरकर, गोपाळ घुमटकर, मीरा बनकर, सरस्वतीताई हारकळ, साळुबा पांडव, बालाजी मुंढे, जगन्नाथ राऊत आदिंनी त्यांच्या विचार व कार्याला अभिवादन करतांना आपल्या भावना व्यक्त केल्या. सदर सभेचे प्रास्ताविक प्रा. सुदाम चिंचाणे यांनी तर सूत्रसंचालन प्रभाकर गायकवाड यांनी केले. याप्रसंगी त्यांचे मित्र, नातेवाईक, मोठ्या संख्येने कार्यकर्ते -कार्यकर्ती यांची उपस्थिती होती.

