तब्बल १७ वर्षानंतर भेटले जिवलग…
![]()
तब्बल १७ वर्षानंतर भेटले जिवलग…
धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर
धरणगाव — येथील बालकवी ठोंबरे विद्यालयात १० वी (२००५) आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १२ वी (२००७) पूर्ण केल्यानंतर शिक्षणासाठी बाहेर गेलेले जिवलग मित्र आज तब्बल १७ वर्षांनंतर एकत्र आले तेव्हा त्यांचा आनंद अवर्णनीय असाच होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाळा व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षणासाठी नामांकित शहरात गेलेले मित्र नंतरच्या काळात नोकरीच्या निमित्ताने विविध ठिकाणी स्थिरावले. परंतु म्हणतात ना मैत्रीचे नातंच फार वेगळं असतं अगदी त्याचप्रमाणे पुणे, मुंबई, गांधीनगर, अहमदाबाद, धरणगाव इ. नानाविध ठिकाणी असलेले मित्र अल्पावधीत झालेल्या नियोजनाने कर्जत रेल्वे स्टेशन पासून १५ किमी अंतरावर असलेल्या “मधुबन” या फार्म हाऊसवर गेट टुगेदर च्या निमित्ताने एकत्र आले. यामध्ये डॉक्टर्स, इंजिनिअर्स, टीचर्स, प्रायव्हेट जॉब करणारे तसेच बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेले मित्र एवढ्या धावपळीच्या जीवनात वेळात वेळ काढून हजर राहिले. माणसाच्या स्वभावात काळानुसार बदल होतात असं ऐकलं होतं परंतु याचा प्रत्यय देखील आला. जी मुलं शाळेत अगदी शांत होती ती खूप बोलत होती आणि जी शाळेत भरभरून बोलायची ती अगदी शांत होती. यामध्ये एक मात्र विशेष होतं की एवढ्या वर्षानंतर भेट झाली यामुळे सर्व मित्र अतिशय जास्त आनंदीत होते. मधुबन या फार्म हाऊसला आल्यानंतर सर्व फ्रेश झाले, नंतर स्विमिंग व विविध खेळांचा आनंद घेतल्यानंतर रात्री मनसोक्तपणे गप्पा झाल्या. ही रात्र संपूच नये असं वाटत होतं कारण ‘राज सबिके होते हैं, किसिके छिप जाते हैं तो किसिके छप जाते हैं।’ अशा रीतीने जुन्या आठवणींना उजाळा देणारी ही रात्र होती. रात्री उशिरापर्यंत गप्पा केल्यानंतर सकाळी फ्रेश होऊन चहा – नाश्ता केल्यानंतर पुन्हा मनमुरादपणे आनंद लुटल्यानंतर दुपारी पुन्हा एकदा सर्वांना घराकडं जाण्याचे वेध लागले. पुन्हा त्या जबाबदाऱ्या बॉस ची आठवण झाली. (घरच्या आणि बाहेरच्या सुध्दा) एकमेकांना निरोप देतांना सर्वांनी मनमुरादपणे आपापल्या मोबाईलमध्ये या भेटीचे फोटो कैद करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि ईच्छा नसतांना देखील एकमेकांना निरोप देऊन घराकडे मार्गक्रमण केले. खरं म्हणजे मित्र कसा का असेना तो असला पाहिजे. मित्र गरीब असेल – श्रीमंत असेल, मूर्ख असेल – हुशार असेल, शांत असेल – फटकळ असेल परंतु जेव्हा केव्हा आपण निराश होतो, हताश होतो, संकटांनी वेढले जातो तेव्हा मित्र खूप गरजेचा असतो. मित्र शेंम्बडया जरी असला तरी तो आपल्याला आत्महत्या करू देत नाही हे जीवनातील अंतिम सत्य आहे म्हणून मित्रांनी एकत्र आल्यानंतर एक अलौकिक ऊर्जा आणि ताकद मिळत असते म्हणून अधेमधे गेट टूगेदर झाले पाहिजे अशी भावना या मित्रांनी व्यक्त केली.
या अतिशय विलोभनीय तसेच अविस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन उमेश पाटील आणि मयूर भावसार यांनी केले होते. या कार्यक्रमाला हरिष लोहार, विशाल पितृभक्त, संदीप महाजन, त्रिदेव पाटील, अमोल वाघ, शुभम भावे, राहुल भावसार, भरत धरम, मोहित पवार, विवेक दाणेज, राज बिचवे, विशाल चौधरी, दिपक पाटील, गणेश माळी, पंकज पाटील, लक्ष्मण पाटील आदी मित्र परिवार उपस्थित होते.


