प्रा. बी.एन.चौधरी यांना प्राचार्य उनउने विशेष बोली काव्य पुरस्कार जाहीर :
![]()
प्रा. बी.एन.चौधरी यांना प्राचार्य उनउने
विशेष बोली काव्य पुरस्कार जाहीर :
अमळनेर प्रतिनिधी
खान्देशातील आहिराणी साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी यांच्या आहिराणी कवितेला सातारा येथील प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउणे विशेष बोली काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा. चौधरी यांच्या आहिराणी मन्ही गोड या कवितेला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्कारप्राप्त एकूण १३ बोलीतील कवींचा सन्मान करण्यात येणार आहे. मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाघमारे यांनी निकाल घोषित केला असून रोख रक्कम, स्मृतीचिन्ह,ग्रंथ आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जानेवारी महिन्यात सातारा येथे स्पर्धेचे पुरस्कार वितरण होणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.
सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातर्फे मराठी बोलीभाषेतील काव्य लेखन स्पर्धा ऑक्टोबरमध्ये घेण्यात आली होती. स्पर्धेत देश विदेशातील १२३ कवींनी १८६ कविता सादर केल्या होत्या. यापैकी पुरस्कारासाठी १३ कवींची निवड करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, काव्य समीक्षक डॉ. विलास चौगुले, डॉ. देवानंद सोनटक्के यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. बोली भाषेतील ही देशातील पहिली राष्ट्रीय स्तरावरील काव्य लेखन स्पर्धा होती. स्पर्धेत सहभागी १२३ कवितांचा बोलीगंध हा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित होणार आहे. प्रा.डॉ.सुभाष वाघमारे व सौ .मीनल अशोक उनउने हे या काव्यसंग्रहाचे संपादन करत आहेत. प्रा. चौधरी यांच्या या यशाचे साहित्य परिवारात अभिनंदन होत आहे.

