अमळनेर विधानसभा निवडणुकीत तिन्ही दादांनी ठोकले शड्डू: कोण मारणार आमदारकीची बाजी?
![]()
अमळनेर विधानसभेमध्ये तिन्ही दादांनी ठोकले शड्डू: कोण मारणार आमदारकीची बाजी?
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्षातून चार-पाच उमेदवार “मीच होणार आमदार!” अशा प्रकारचे बॅनर लावून आमदार झाल्यासारखे प्रदर्शन करीत आहेत.
संपूर्ण तालुक्यात महायुतीचा उमेदवार म्हणून मा. मंत्री अनिल पाटील विधानसभा निवडणूक लढणार आहेत, तर महाविकास आघाडीच्या गटातून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यामध्ये त्रिशंकू निवडणूक अटीतटीची होईल, असे संकेत सध्या दिसत आहेत.
तिन्ही उमेदवारांचे प्रचार जोरात सुरू आहेत. माजी मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यकाळात यशस्वीरित्या पार पडलेल्या विकास कामांची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी जनतेसमोर ठेवली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या सभांचे आयोजन केले जात आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी व खासदार स्मिताताई वाघ हे या निवडणुकीत प्रतिष्ठापणाला लावताना दिसत आहेत.
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी शरदचंद्र पवार गटातून तुतारी या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीत काही गोंधळ निर्माण झाला होता, परंतु त्यांनी वीस तारखेनंतर उमेदवारीची घोषणा करण्याचा इशारा दिला आहे. साहेब पाटील यांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागात अनेक ठोस विकास कामे केली आहेत. यामुळे त्यांचा लोकांत एक रोखठोक उमेदवार म्हणून दर्जा निर्माण झाला आहे.
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाचे तिकीट घेतल्यामुळे पराभव पत्करावा लागला. परंतू या वेळी ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या प्रचारात सर्व पदाधिकारी सक्रिय आहेत, आणि त्यांचा ओबीसी वर्ग मोठा आधारभूत आहे.
अमळनेरकर जनतेला कोणाच्या बाजूने उभे राहायचे आहे? हे आगामी निवडणुकीच्या काळात ठरवले जाईल. तिन्ही उमेदवार त्यांच्या कार्याची व विकासकामांची माहिती जनतेसमोर मांडत आहेत. अमळनेर तालुक्यात सध्या सुमारे तीन लाख मतदार आहेत, आणि या निवडणुकीत वाढीव मतदारांचा फायदा कुणाला होईल? हे देखील महत्त्वाचे ठरेल.
तालुक्यात पाडसे धरण, बेरोजगारी, महागाई, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना, शेतकऱ्यांच्या विविध समस्या व मागण्या आदी अनेक बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. या समस्यांचे समाधान कोणत्या दादाला करायचे आहे, हे येणारा काळच ठरवेल. अमळनेरमध्ये नवीन मतदार कोणात्या व्यक्तींना संधी देतील याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीतील यशस्वी उमेदवार कोण हा यक्षप्रश्न बनला आहे.

